
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात कुशेगाव या दुर्गम ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी व पोस्टर प्रदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. राष्ट्रीय जन आरोग्य प्रशिक्षण व संशोधन केंद्र मुंबई, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवऱ्हे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. ह्या शिबिरात एनआयपीएचटीआर मुंबईच्या डीएचपीई (DHPE) अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी अर्जुन मंडलिक यांनी उच्च रक्तदाब, सचिन अत्रे यांनी पोषण व आहार, अश्विनी गरुड यांनी रक्तक्षय विषयावर ग्रामस्थांना सखोल मार्गदर्शन व प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती दिली. शिबिरात 168 नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांची उच्च रक्तदाब तपासणी, रक्तातील शर्करा, हिमोग्लोबिन तपासणी, औषधोपचार जरून त्यांना गरजेनुसार संदर्भित करण्यात आले.
स्वस्थ निरोगी जीवनासाठी नियमित व्यायाम करावा. संतुलित आहार घ्यावा. आहारात जास्तीत जास्त स्थानिक भाज्या व फळांचा वापर करावा असे आवाहन डॉ अमोल आडे यांनी केले. शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सीएमओ डॉ अमोल आडे यांनी केले. यावेळी विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सरिता पानसरे-खैरे व अर्चना जोशी उपस्थित होत्या. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांनी ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. दावल साळवे, वाडीवऱ्हेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, सीएनओ तेजस्विनी मेश्राम यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणार्थी संगीता जाधव, अर्चना देशमुख, धनंजय पगार, श्रीमती मोरे, निकिता कापडणीस, श्री. मयूर, आरोग्य सेविका जयश्री राठोड, आरोग्यसेवक सतीश जाधव, सर्व आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. सचिन अत्रे यांनी आभार मानले.