
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षिका माधुरी केवळराव पाटील शेवाळे यांना यंदाचा “स्मिता पाटील शब्द पेरा” पुरस्कार घोषित झाला आहे. अहमदनगर येथील एटीएम प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या स्वलिखित “मनपाखरू” ह्या कविता संग्रहाला हा पुरस्कार मिळणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील कविता संग्रहांना दरवर्षी “स्मिता पाटील शब्द पेरा” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्कारासाठी नाशिक जिल्ह्यातील कवी, कवयित्री यांचे समवेत माधुरी पाटील शेवाळे यांची निवड झाल्याने इगतपुरी तालुक्यात त्यांचे अभिनंदन सुरु आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करतांना माधुरी पाटील शेवाळे ह्या नाशिक जिल्ह्यातील उपक्रमशील, तंत्रस्नेही आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत. त्यांना नाशिक जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांना विविध विषयावरील वाचन, लेखनाची आवड असून त्यांनी वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. मधुवेल, मनपाखरू, त्यागमूर्ती कुमुदिनी, पालकांची आचारसंहिता आणि समाजरत्न ही ४ वाचनीय पुस्तके यापूर्वी प्रकाशित झालेली आहेत. गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याने इगतपुरीसह संपूर्ण जिल्हाभर त्यांचे अभिनंदन सुरु आहे. ह्या पुरस्कारामुळे आगामी काळात मोठे काम उभे करण्यासाठी आत्मबळ आणि ऊर्जा मिळणार असल्याचे माधुरी पाटील यांनी सांगितले. पुरस्कार वितरण १५ जानेवारीला नाशिक येथे शेकोटी संमेलन भावबंधन मंगल कार्यालय “कमलाकर आबा देसले साहित्य नगरी येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली.
