पुंजाजी मालुंजकर यांच्या “ठिणगी” पुस्तकाचे प्रकाशन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व लेखक पुंजाजी मालुंजकर यांच्या “ठिणगी ” या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्री स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या दिवशी संपन्न झाले. आमची माती, आमची माणसं कार्यालयात साहित्यिक प्रा. गिरीष पाटील यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकेच मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी लेखक पुंजाजी मालुंजकर, प्रकाशक प्रा. डॉ. संजय जाधव, जेष्ठ पत्रकार ब्रिजकुमार परिहार, अँड. ज्ञानेश्वर गुळवे, दिनेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुंजाजी मालुंजकर यांचे हे आठवे पुस्तक आहे. “ठिणगी” कथासंग्रह या पुस्तकात एकुण नऊ दीर्घकथा आहेत. एका ठिणगीमुळे लागणारा वणवा, त्यातून होणारी होरपळ व पर्यावरणाची हानी या ज्वलंत प्रश्नावर उत्तरं शोधणारी व एक नवीन सर्व समावेशक पर्याय सुचवणारी “ठिणगी” ही अभ्यासपुर्ण कथा वाचावयास
मिळेल. बचतीचे महत्व पटवून देणारी “चपलाहार” ही कौटुंबिक कथा, “बाळाचं गुपीत”, ” असं कसं घडतं? “या गूढ़कथा, जगण्याचं भान शिकविणाऱ्या ” नवं क्षितिज “, “परत फिरा हो !”, “बांडगुळ”, “यशाचे धनी”, आणि “पहाटवारा” या बोधकथा वाचकांना, आबालवृद्धांना नक्कीच आवडतील.
श्री. मालुंजकर यांच्या “चैत्रपालवी” या कथेवर आधारित एक सिनेमा ही लवकरच येत आहे. या चित्रपटाच्या उदघाटनाचा शॉट होलीपूजनाने गडगडसांगवी या निसर्गरम्य परिसरात घेण्यात आला आहे.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

error: Content is protected !!