इगतपुरीनामा न्यूज, दि. 20
घोटी बुद्रुक ग्रामपालिका हद्धीतील ओमानंदनगर येथील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण व सार्वजनिक पाणीपुरवठ्याला गोविंद कचरू भोर व शंकर कचरू भोर यांनी गेल्या अनेक वर्षापासुन अडथळा निर्माण केलेला आहे. ह्याकडे घोटी ग्रामपालिका दुर्लक्ष करीत असल्याने घोटीवाडी येथील नागरिक संतप्त झालेले आहेत. 21 नोव्हेंबरपर्यंत ग्रामपालिकेने कार्यवाही करण्यासाठी अल्टीमेटम देण्यात आला आहे. अन्यथा 22 नोव्हेंबरला घोटीवाडी ग्रामस्थांकडून ग्रामपालिका कार्यालयात सकाळी 11 वाजता आत्मदहन करण्यात येणार आहे असा इशारा मल्हारी कचरू दालभगत यांनी घोटीवाडी ग्रामस्थांतर्फे निवेदनात दिला आहे. सरपंच, ग्रामविकास अधिकारी ग्रामपालिका घोटी बुद्रुक यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे. योग्य त्या कार्यवाहीसाठी निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नाशिक, तहसिलदार इगतपुरी, गटविकास अधिकारी पंचायत समिती इगतपुरी, पोलीस निरीक्षक घोटी पोलीस स्टेशन यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या आहेत.
निवेदनात नमूद आहे की, ओमानंदनगर येथील सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण व सार्वजनिक पाणीपुरवठ्याला गोविंद कचरू भोर व शंकर कचरू भोर यांनी गेल्या अनेक वर्षापासुन अडथळा निर्माण केलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना ह्या रस्त्याने जाणे येणे अवघड झालेले आहे. याबाबत ग्रामस्थांनी ऑक्टोबरमध्ये सर्व रहिवाशांच्या वतीने ग्रामपालिका कार्यालयात तक्रार अर्ज दिलेले असून याअगोदरही अनेकदा तक्रार अर्ज, तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. परंतु ग्रामपालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. वादग्रस्त रस्ता व पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपालिकेला सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. ह्या काळात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर घोटीवाडी ग्रामस्थांना घेऊन घोटी बुद्रुक ग्रामपालिका कार्यालयात 22 नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिवंत आत्मदहन करणार असल्याचा इशारा मल्हारी कचरू दालभगत यांनी घोटीवाडी ग्रामस्थांतर्फे दिला आहे.