
इगतपुरीनामा न्यूज, दि. 15
त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या आधारतीर्थ आश्रमामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे खाण्याचे हाल होत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होता. याची सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा बुद्रुक पुणे या महाविद्यालयाने दखल घेतली. राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आधार आश्रमास मदत म्हणून किराणा, कपडे, औषधे, नेब्युलायझर, खाण्याचे विविध पदार्थ, रोख रक्कम असे मिळून अंदाजे ३० हजारांची मदत केली.
आपली सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसीचे रासेयो अधिकारी प्रा. रमेश गाडेकर, रासेयो स्वयंसेवक राहुल सौंदलगेकर, दयानाथ काकड, योगेश कुंटे यांनी आधार आश्रमास भेट दिली. तेथील लहान मुलांशी संवाद साधून त्यांना विविध वस्तू भेट स्वरूपात दिल्या. यावेळेस प्रा. रमेश गाडेकर यांनी या सर्व लहान अनाथ मुलांना आपुलकीचा हात देत जीवनातील कोणत्याही संकटाला न घाबरता आनंदाने जगण्याचा कानमंत्र दिला. भविष्यात कोणत्याही स्वरूपाची मदत लागली तर ती पूर्ण करण्याची हमी दिली.
सर्व कार्यक्रमाचे नियोजन रासेयो कधिकारी श्री. गाडेकर यांनी प्राचार्य डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केले. महाविद्यालयाने केलेल्या कार्याबद्दल आधारतीर्थ आश्रमातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. नाशकातील नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन विविध ठिकाणी असलेल्या आधार आश्रमामध्ये एक खारीचा वाटा म्हणून थोडीफार मदत करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.