ललिता पंचमीनिमित्त इगतपुरीत ग्रंथदिंडी संपन्न : चिमुकल्यांसहित महिलांनी गरबा खेळण्याचा लुटला आनंद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30

इगतपुरी येथील नूतन मराठी शाळा, बालमंदिर येथे ललिता पंचमी निमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ही ग्रंथ दिंडी नूतन मराठी शाळा ते गांधी चौक येथील शितला माता मंदिरा पर्यंत काढण्यात आली. दिंडी मार्गस्थ होत असताना मार्गावरील नागरिकांनी दर्शन घेऊन दिंडी आपल्या खांद्यावर घेतली. शितला माता मंदिरात विधिवत पूजन करून चिमुकल्यांसहित महिलांनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. दिंडी परत शाळेत आल्यानंतर शाळेच्या आवारात होमहवन करण्यात येऊन प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी बालकांसहित पालकांनी सर्वधर्मीय महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष अशोक नावंदर, माजी शिक्षिका अग्निहोत्री, महात्मा गांधी हायस्कूलच्या उपमख्याध्यापिका सुचेता कुकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका शांता तूसे, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अविनाश कुलकर्णी, बालमंदिर अधीक्षक प्रसाद चौधरी, संगणक निदेशिका अनिशा कुलकर्णी यांच्यासह महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!