आधार कार्डसाठी दहा वर्षाच्या “निराधार” प्रवासाला पूर्णविराम ; निनावीच्या शेतकऱ्याला अखेर मिळाले “आधार कार्ड”

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12
विविध शासकीय योजनांपासून गॅस, बँक खाते, खतांची खरेदी, पॅन कार्ड, विमा पॉलिसी, जमिनीची नुकसान भरपाई आदींपर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे. असे असले तरी इगतपुरी तालुक्यातील निनावी ह्या गावातील शेतकरी शंकर गायकवाड यांना शेकडो प्रयत्न करूनही आधार कार्ड मिळत नव्हते. 2011 पासून ते आजपर्यंत त्यांनी शेकडो आधार केंद्र ते मुंबईचे कार्यालय गाठूनही त्यांना आधार कार्ड मिळाले नाही. ह्यामुळे त्यांचे गॅस कनेक्शन तर केव्हाच बंद झालेले आहे. एक  वर्षात त्यांचे किमान 2 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडून आधार मिळावे म्हणून त्यांनी अनेक खेटा घातल्या. मात्र त्यांना आधार नसल्यामुळे ह्या शेतकऱ्यावर निराधार व्हायची मात्र वेळ आली होती. अखेर घोटी येथील आधार केंद्राचे संचालक अंकुश जाधव यांच्या अविरत प्रयत्नांना यश येऊन शंकर गायकवाड यांना आधार मिळाले. गायकवाड यांनी अंकुश जाधव यांचे आभार मानून आनंदोत्सव साजरा केला.
इगतपुरी तालुक्यातील निनावी गावातील शंकर गायकवाड हे कष्टकरी शेतकरी आहेत. कष्टामुळे त्यांच्या हाताचे ठसे पूर्णपणे पुसून गेले आहेत. 2011 पासून त्यांनी जिल्ह्यातील विविध आधार कार्ड सेंटरला खेटा घातल्या. 10 वर्षांपासून ते आधार कार्ड मिळावे म्हणून अविरत प्रयत्न करीत होते. त्यांच्याकडे शेकडो आधारच्या पावत्या असून आधारच्या मुख्य कार्यालयाकडून त्यांचे आधार प्रत्येकवेळी नाकारले जात होते. त्यामुळे ते आधार कार्डपासून वंचित असल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागला.
आधार नसल्यामुळे त्यांचे गॅस कनेक्शन आणि मिळणारे अनुदान बंद करण्यात आले होते. बँकेत खाते उघडण्यासाठी त्यांची धडपड सुद्धा व्यर्थ गेली. ग्रामपंचायतींकडून मिळणारे शौचालय बांधकामाचे अनुदान सुद्धा नाकारण्यात आलेले आहे. आधार शिवाय शेतीसाठी खते, औषधे विकत घेता येत नाही. शेतकऱ्यांच्या दुष्काळी आणि कर्जमाफीचा त्यांना आधार नसल्याने फायदा मिळाला नाही. आधारमुळे पॅनकार्डसाठीही समस्या येत आहे. एका वर्षात किमान त्यांना 2 लाखांचा विनाकारण फटका बसल्याने ते मेटाकुटीस आले होते.
अखेर घोटी येथील आधार केंद्राचे संचालक अंकुश जाधव यांची आणि शंकर गायकवाड यांची भेट झाली. गायकवाड यांचे संपूर्ण प्रकरण समजावून घेत श्री. जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुन्हा प्रक्रिया केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले. आधार कार्ड मिळाल्याचा मोठा आनंद शंकर गायकवाड यांनी व्यक्त केला.

घोटी येथील आधार केंद्राचे संचालक मयूर पहाडिया आणि इगतपुरी तालुक्यातील पत्रकार भास्कर सोनवणे यांनी गेल्या काही वर्षांपासून शंकर गायकवाड यांच्यासाठी पाठपुरावा केला होता. आधार मिळाल्याचे समजताच त्यांनी श्री. पहाडिया आणि श्री. सोनवणे यांचीही कृतज्ञता व्यक्त केली.

आधार मिळाल्याने निराधार नसल्याचा आनंद

आधार नसल्याने काय काय सोसले आहे याची आठवण आली तरी शहारे येतात. अनेकांच्या सांगण्यावरून आधार कार्डसाठी मी शेकडो ठिकाणी फिरलो आहे पण यश येत नव्हते. अंकुश जाधव यांनी माझ्या प्रकरणात संपूर्ण तपशील माहीत करून नियमाप्रमाणे मला आधार मिळवून दिले. आता दहा वर्षांनंतर आधार मिळाल्याने मी निराधार राहिलो नाही याचा आनंद वाटतो.
शंकर गायकवाड, शेतकरी निनावी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!