आज 47 कोरोना पॉझिटिव्ह वाढले ; वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रांत अनेकजण बाधित असूनही 5 जणांकडून अभिमानास्पद कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12
कोरोनाच्या संक्रमणाचा फटका इगतपुरी तालुक्याला चांगलाच बसत असून आज एकाच दिवशी तब्बल 47 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज सायंकाळ 5 वाजेपर्यंत 334 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे वृत्त आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी फक्त 5 जण कोरोनापासून दूर आहेत. अशी गंभीर परिस्थिती असूनही आरोग्य केंद्रातील कोरोनापासून दूर असणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांनी दिवसभर नागरीकांना वैद्यकीय सेवा दिली. 170 नागरिकांना लसीकरण सुद्धा करण्यात आले. अत्यंत बिकट परिस्थिती असतांना सुद्धा 5 कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे इगतपुरी तालुक्यात कौतुक होत आहे. तालुक्याची आरोग्य यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत असूनही नागरिक साधे नियम पाळू शकत नसतील तर पुढे काय ? असा सर्व उपस्थित झाला आहे.
इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित स्वरूपात होत आहे. सगळीकडेच वैद्यकीय साधनांचा तुटवडा असल्याने समस्या निर्माण होत आहेत. अशा स्थितीत रुग्णांवर तत्परतेने उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे नेतृत्व इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख हे कुशलतेने करीत असून दिवसभर त्यांच्याकडून तालुक्यात सूक्ष्म लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी भयानक परिस्थिती थांबवण्यासाठी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.