इगतपुरीच्या तरुणाला जिल्हा न्यायालयाकडून जन्मठेप आणि दंडाची शिक्षा : अंगावर पेट्रोल टाकून तरुणाच्या मृत्यूचे प्रकरण भोवले ; इगतपुरी पोलिसांच्या तपासाला मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

अंगावर पेट्रोल टाकून तरुणाची हत्या करणाऱ्या इगतपुरीच्या आरोपीला नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी जन्मठेप आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. इगतपुरी तालुक्यात 2018 मध्ये गाजलेल्या या प्रकरणावर जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला. इगतपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी ह्या प्रकरणाचा सर्वांगीण तपास आणि सबळ पुरावे जमा केल्याचे न्यायालयाने ग्राह्य धरले. सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. योगेश कापसे यांनी काम पाहिले. कुणाल किशोर हरकरे वय 28, रा. भजनी मठाजवळ, इगतपुरी असे जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, 23 सप्टेंबर 2018 ह्या दिवशी इगतपुरीच्या कोकणी मोहल्ला येथे दीपक खंडू बोरसे, प्रशांत ऊर्फ लखन खंडू बोरसे हे गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी काम करीत होते. यावेळी कुणाल किशोर हरकरे याने खुनशीने पाहत असल्याचा राग धरून दीपक बोरसे, प्रशांत बोरसे या भावांसोबत वाद घातला. ह्या भागातील नागरिकांनी यावेळी हा वाद मिटवला. त्यानंतर गणपती विसर्जन पार पडले. रात्रीच्या वेळी सुरेश प्रभूदयाल गुप्ता ऊर्फ बबलीशेठ आणि बोरसे बंधू गल्लीत गप्पा मारत होते. याचवेळी संशयित आरोपी कुणाल हरकरे याने दुपारच्या भांडणाचा राग मनात धरून लखन बोरसेवर पेट्रोल टाकले. आगीचा पेटता बोळा लखन बोरसे याच्या अंगावर फेकला. दीपक व बबलीशेठ यांच्याही अंगावर पेट्रोल उडाल्याने तसेच लखनची आग विझविताना दोघेही भाजले. भाजल्यामुळे गंभीर जखमी असलेल्या प्रशांत बोरसेवर मुंबईत रउपचार सुरू असताना तिसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. इगतपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी तपासाची चक्रे फिरवली. कुणाल हरकरेच्या विरोधात सबळ पुरावे जमा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांच्यासमोर खटल्याचे सुनावणी कामकाज झाले. फिर्यादी, साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून कुणाल हरकरे याला जन्मठेप  आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!