वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
इगतपुरीतील मानस रिसॉर्ट जवळील पश्चिम भागात खाजगी बंगल्यामधील स्काय ताज व्हीला मधील रेव्ह पार्टीवर शनिवार दि. २७ रोजी मध्यरात्री पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकुन ३१ संशयित आरोपींना अटक केली होती. सोमवारी या सर्व संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केल्यावर यातील अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या चार आरोपीसह एका महिलेला ९ दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली तर बाकी २५ आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनविण्यात आली होती. आज त्यांची एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने इगतपुरी पोलीसांनी या उर्वरीत हिना पांचाळ, श्रृती शेट्टी, चांदणी भटीजा, ऋची नार्वेकर, ज्योती नाईक, करिष्मा शेट्टी, प्रिती चौधरी, शयाना लांबा, अशिता शर्मा, सिना गबलानी, विभा गोंडोलीया आदी १२ महिला व अमित लाट, आशिष लाट, राजेश त्रिवेदी, विशाल मेहता, अबु बकर शेख, रोहित अरोरा, सुशांत सावंत, संदीप भोसले, राकेश कांगो, फैजान बेग, अझर फारनोद, दानिश खान, राजु मगरे, भगवान माळी आदी १३ पुरुष संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता या सर्वांचा जामीन न्यायालयाने फेटाळला. त्या सर्वांना ५ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या केसमध्ये काही आरोपी फरार असुन एका मुलीच्या खिशामध्ये ड्रग्ज सापडल्याने त्याचा तपास होणे बाकी असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील मिलींद निर्लेकर यांनी न्यायमुर्ती आर. एन. खान यांच्या समोर केल्याने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अमली पदार्थाच्या आरोपात पियुष शेठीया, हर्ष शहा, निरज सुराना, नायझेरीयन नागरिक उमाही पीटर आदी ९ दिवसाच्या पोलीस कोठडीत आहेत.
इगतपुरीतील मुंबई आग्रा महामार्गावरील स्काय ताज व्हीलामध्ये तीन दिवसाची हवाईयम थीमवर रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र याची कुणकुण ग्रामीण पोलीस अधिक्षक पाटील यांना गुप्त खबऱ्याच्या माहितीच्या आधारावर मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकला असता येथे अनेक तरुण व तरुणी मद्यधुंद व कोकेनसह इतर ड्रग्ज घेतलेल्या व तोकड्या कपड्यात विभत्स अवस्थेत आढळुन आले. या छाप्यात मराठी अभिनेत्री बॉस फेम हिना पांचालसह हिंदी व दक्षिणात्य सिनेमा व टीव्ही मालिकांशी संबंधित अभिनेत्री व कोरीओग्राफर यांच्यासह हायप्रोफाइल पुरुष व महिला रेव्ह पार्टीत सापडल्याने खळबळ उडाली होती. या दोन खाजगी बंगल्यात संशयित पियुष सेठी याच्या वाढदिवसाचे निमित्त करून हवाईयन बेटांवरील संस्कृतीला साजेशी हवाईयन रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती.
या घटनेचा पुढील तपास जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, सचिन देसले, ईश्वर गंगावणे, मुकेश महिरे, वैभव वाणी, मारुती बोराडे, संदीप शिंदे आदी करत आहे. सदरचे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांकडे सोपवण्यात आले असुन पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, नवनाथ गुरुळे, पोलीस हवालदार संदीप हांडगे, सचिन पिंगळ आदी पुढील तपास करणार आहे. इगतपुरी तालुक्यात अनेक भागात पर्यटनक्षेत्र असल्याने मुंबई, पुणे, नाशिक आदी भागातील बिल्डर व धनाढय लॉबीने येथे जागा घेऊन मोठे रिसॉर्ट, फार्म हाऊस व बंगले मोठ्या प्रमाणात बांधले आहेत.