बालसाहित्यिक पत्रकार संजय वाघ साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

नवी दिल्ली येथील सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेच्या वतीने बालसाहित्यिक पत्रकार संजय वाघ यांना कोलकाता येथे बालसाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेलवेडेरे अलीपूर येथील राष्ट्रीय ग्रंथालयातील भाषा भवनच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता संपन्न झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक तर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात बंगाली साहित्यिक शिर्षेन्दु मुखोपाध्याय उपस्थित होते

संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ या बहुचर्चित किशोर कादंबरीला २०२१चा साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार घोषित झालेला होता. त्यांची आतापर्यंत २६/११ चे अमर हुतात्मे, डॉ. श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम, गंध माणसांचा, ऊन सावल्या, जोकर बनला किंगमेकर, गाव मामाचं हरवलं, बेडकाची फजिती, गोष्ट बोलक्या पोपटाची ही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. कंकना मित्रा यांच्या ‘आनंदधारा बोहीचे भूबोने’ या गीताने झाली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी स्वागत केले. भारतीय संस्कृती आणि वारसा समृद्ध करण्यात बंगाली विचारवंतांनी बजावलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. मुखोपाध्याय म्हणाले, लहान मुलांचे मन अत्यंत कल्पक असते, ते योग्यरित्या हाताळून त्यांना आकार देण्याची गरज आहे. यासोबतच प्रत्येकाआड दडलेल्या लहान मुलाला अखेरपर्यंत जिवंत ठेवता आले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

माधव कौशिक यांनी अध्यक्षीय भाषणात बालसाहित्यकारांनी पुढे येऊन लेखनातून तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणानंतर डॉ. के. श्रीनिवासराव यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले आणि त्यानंतर २२ भाषेतील बालसाहित्यिकांना मुखोपाध्याय यांनी पुष्पहार तर कौशिक यांनी ताम्रपट व रुपये पन्नास हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला. याप्रसंगी डॉ. मृणाल चंद्र कलिता (आसामी), श्री सुनीरमल चक्रवर्ती (बंगाली), श्री रत्नेश्वर नरझरी (बोडो), श्री नरसिंग देव जामवाल (डोगरी), कु. अनिता वछराजानी (इंग्रजी), श्री देवेंद्र मेवारी (हिंदी), डॉ. बसू बेविनागीदाद (कन्नड), श्री मजीद मजाझी (काश्मीर), सौ. सुमेधा कामत देसाई (कोंकणी), डॉ. अनमोल झा (मैथिली), श्री रघुनाथ पालेरी (मल्याळम), श्री निंगोम्बम जादुमणी सिंग (मणिपुरी), पत्रकार संजय वाघ (मराठी), सुदर्शन अंबाते (नेपाळी), डॉ. दिगराज ब्रह्मा (ओडिया), कु. कीर्ती शर्मा (राजस्थानी), कु. आशा अग्रवाल (संस्कृत), सोवा हंसदा (संताली), किशीन खुबचंदानी “रंजयाल” (सिंधी), एम. मुरुगेश (तमिळ), डॉ. देवराजू महाराजू (तेलुगु) आणि कौसर सिद्दीकी (उर्दू) या बालसाहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!