इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
शिवसेना रिपाई युतीचे इगतपुरी नगरपालिकेत १३ नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष अशी सत्ता असून भाजपाचे ४ नगरसेवक तर शिवसेना संबंधित १ अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. ह्या नगरपालिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटाचे विशेष लक्ष लागले असल्याची खमंग चर्चा सुरु झाली आहे. माजी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, नुकतेच शिंदे गटात गेलेले इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, एक इगतपुरीचा नगरसेवक यांनी याबाबत सूक्ष्म हालचाली सुरु केल्याबाबत इगतपुरी शहरात दबक्या आवाजात चर्चा रंगली आहे. शिवसेनेची अबाधित असणारी २५ वर्षांपासूनची सत्ता इगतपुरीमध्ये आहे. यासह राज्याचे प्रवेशद्वार असल्याने इगतपुरी पालिका ताब्यात ठेवण्यासाठी शिंदे गट मोर्चेबांधणी करीत असल्याचे कानावर आले आहे. प्राथमिक स्वरूपात ६ नगरसेवक गळाला लागले असल्याबाबत नागरिकांच्या गप्पामधून पुढे आलेले आहे. यांसदर्भात इगतपुरी परिसरात बैठका होत असल्याची सुद्धा चर्चा इगतपुरी तालुक्यात पसरली आहे. येत्या काही महिन्यात इगतपुरी नगरपालिकेचे नगरसेवक नेमकी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
इगतपुरी नगरपालिकेची निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून अद्याप आरक्षण प्रकिया बाकी आहे. ह्या शहरात 25 वर्षापासून शिवसेनेची अबाधित सत्ता आहे. म्हणून ही पालिका आपल्या ताब्यात असावी असा मतप्रवाह शिंदे गटाकडून व्यक्त केल्यास कोणाला आश्चर्य वाटायला नको. नुकतेच माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत इगतपुरी येथील 1 नगरसेवक असल्याने येथील नगरसेवक गळाला लावण्यासाठी लॉबिंग सुरु केल्याची चर्चा आहे. माजी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाने इगतपुरीत शिंदे गटाने काम सुरु केले असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. कट्टर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून इगतपुरी पालिका ओळखली जात असली तरी आगामी काळात काय निर्णय होतात यावर पुढील दिशा अवलंबून असेल असे एका राजकीय जाणकाराने सांगितले. प्राथमिक स्वरूपात इगतपुरीचे 6 नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याबाबत नागरिकांमध्ये बोलले जात आहे. काही दिवसात किंवा काही महिन्यांत नगरसेवकांच्या हालचाली प्रत्यक्षात येणार असल्याने तोपर्यंत नागरिकांना नुसती चर्चा आणि अफवा यावरच भर द्यावा लागणार आहे.