इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
कुर्णोली ता. इगतपुरी येथील सामान्य शेतकऱ्याला वीज मंडळाकडून नाहक त्रास देण्याचे काम सुरु असल्याचे समोर आले आहे. कुर्णोली ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच गुरुनाथ जोशी वीज मंडळाच्या कारभाराला कंटाळले असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या स्वतःच्या जागेत वीज मंडळाला पोल लावण्यासाठी दिलेली परवानगी त्यांच्या अंगलट आली असून वीज मंडळ सहकार्य करायला तयार नाही. स्वतःच्या जागेत वीज मंडळाचे कुठलेही भाडे न घेता उभे असलेल्या ५ विजेच्या खांबापैकी फक्त 2 जीर्ण झालेले खांब बाजूला करण्यासाठी गेल्या ३ महिन्यांपासून त्यांना वीज मंडळाचे अधिकारी वेड्यात काढत आहेत. नवे घर बांधण्यासाठी खांब बाजूला करणे आवश्यक असतांना वीज मंडळाचे काही लोक त्यांच्याकडे पैशांची मागणी करीत असल्याने त्यांनी वैतागून प्रश्न न सुटल्यास अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्वतःची जागा असूनही घर बांधण्यासाठी अडवणूक करणाऱ्या वीज मंडळाला धडा शिकवण्याचा निर्धार गुरुनाथ जोशी यांनी केला आहे. याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील कुर्णोली येथील उपसरपंच गुरुनाथ जोशी यांच्या स्वमालकीच्या जागेमधून वीज मंडळाचे 5 खांब गेलेले आहेत. सर्वच खांब अतिशय जीर्ण आणि कोणत्याही क्षणी कोसळतील अशा अवस्थेत आहेत. यापैकी 2 खांब बाजूला करून घर बांधण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यानुसार इगतपुरी कार्यालयातील अधिकाऱ्यांशी पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि नियमित संपर्क त्यांनी साधला. स्वतःच्या जागेत असणारे विजेचे जीर्ण आणि कोसळणारे खांब बाजूला करून घर बांधण्याची समस्या दूर करण्याबाबत त्यांनी वारंवार प्रयत्न केला. मात्र वीज मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. इगतपुरी आणि नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा घर कशाला बांधता असा उर्मट सवाल केला असा आरोप गुरुनाथ जोशी यांनी केला आहे. मालकीच्या जागेत असणाऱ्या खांबाचे कुठलेही भाडे देत नसतांना वीज मंडळ करीत असलेले असहकार्य त्यांचा संताप वाढवण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. चौकशीला येणाऱ्या व्यक्तींकडून ह्या कामासाठी मोठी रक्कम मागितली जात आहे. परिणामी उपसरपंच गुरुनाथ जोशी यांनी 20 जुलैला वीज मंडळाच्या इगतपुरी कार्यालयासमोर त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी अर्धनग्न आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जीर्ण झालेल्या विजेच्या खांबामुळे अनेकांच्या जीविताला निर्माण झालेला धोका दूर करावा, खांब स्थलांतरित करून घर बांधण्यासाठी जागा मोकळी करावी अशी त्यांची मागणी आहे.