खड्डेच खड्डे चोहीकडे – पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा रस्त्यावर असंख्य खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त : तात्काळ उपाययोजना करा अन्यथा आंदोलन – युवासेना जिल्हा नेते मोहन बऱ्हे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा रस्त्यावर लाज वाटेल असे शेकडो खड्डे पडले आहेत. ह्या खड्ड्यांमुळे या भागातून जाणारे नागरिक सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना शिव्याशाप देत आहेत. संबंधित यंत्रणेमार्फत ह्या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असून सिन्नर मतदारसंघाचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी सुद्धा डोळेझाक करीत आहेत. ह्या रस्त्यामुळे ह्या भागातील नागरिकांचा आणि वाहनधारकांचा संताप उग्र स्वरूप धारण करीत आहे. येत्या ८ दिवसात ह्या रस्त्याची डागडुजी करावी. भक्कम कामाबाबत लेखी स्पष्ट भूमिका करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा युवासेनेचे जिल्हा नेते मोहन बऱ्हे यांनी दिला आहे. अनेक वर्षांपासून ह्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना कारण नसतांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत असून अधिकाऱ्यांची भूमिका संशय वाढवत आहे. यासह लोकप्रतिनिधी का गप्प बसले आहेत? असा सवाल मोहन बऱ्हे यांनी उपस्थित केला आहे. या रस्त्याच्या कामाबाबत सतत लक्ष घालून लोकांना न्याय मिळवून देऊ असेही मोहन बऱ्हे यांनी सांगितले.

पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा ह्या तब्बल ९८ कोटींच्या रस्त्याची दोन वर्षांपासून आजपावेतो प्रतिक्षाच आहे. दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे हा रस्ता कायमच खड्डेमय आणि काही ठिकाणी खचून जात असतो. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून सुमारे १३ किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण होणार असल्याचे गाजर अनेक वर्षांपासून लोकांना दाखवले जात आहे. हा जुना कोल्हार रस्ता असून ह्या रस्त्यावर भंडारदरा, कळसूबाई, खेडभैरव, टाकेद पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्र आणि खेड प्राथमिक आरोग्य केंद्र असून आदिवासी वाड्या-पाड्यांवरून रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. ह्या १३ किलोमीटर अंतरासाठी खड्ड्यांमुळे किमान 2 तास लागत असून वाहने सुद्धा बिघडत असतात. नोकरीनिमित्त ये-जा करणारे चाकरमाने, विद्यार्थी, पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिकांना फटका बसत असून दयनीय रस्त्यामुळे नागरिक अधिकाऱ्यांना सर्वजण शिव्याशाप देत असतात.

पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा मार्गातील अडसर ठरणारे हॉटेल्स व दुकाने पोलिसांना आणून काढून स्थानिकांची रोजीरोटी हिरावून सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमकं काय साधलं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. रस्त्यावर पडलेले जवळपास दोन-दोन फूट खोल खड्यांचा पाण्यामुळे अंदाज येत नसल्याने दुचाकींचा अपघात होत आहे. अपघात किरकोळ असले तरी मोठे अपघात होऊन जीवितहानी अथवा अपंगत्व येण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून रस्ता मंजूर झाला असल्याने रस्त्याची साधी डागडुजी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग धजावत नाही. मागील वर्षी खडी-डबर टाकून मलमपट्टी केली होती. यंदा तेवढे करण्याची तसदी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नसल्याने येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे जिल्हा नेते मोहन बऱ्हे यांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!