इगतपुरीनामा न्यूज, दि. २
लग्न म्हटले की टॉवेल, टोपी, लुगडे, साड्या, फेटे यासारख्या प्रथा खिशाला रिकामे करुन कर्जबाजारी बनवतात. यामध्ये आपला भरपूर पैसा अनाठायी खर्च होतो. रुसवे फुगवे सुद्धा वाढतात..म्हणूनच ही प्रथा थांबली पाहिजे यासाठी इगतपुरी तालुक्यातील शिक्षक गोविंदा रामा गिळंदे, शिक्षिका पत्नी पार्बता गोविंदा गिळंदे यांनी स्तुत्य संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. सुधारणेची सुरुवात आपण स्वतःच्या मुलीच्या लग्नापासूनच करावी या उदात्त हेतूने त्यांनी पाऊल उचलले. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबावा म्हणून त्यांनी लग्नात आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना आंबा, वड, चिंच, फणस, चिकू, पेरू इत्यादी झाडांच्या उत्तम प्रतीच्या उपयुक्त रोपवाटिका सप्रेम भेट दिल्या.
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी लग्नात भेट दिल्यावर त्यांच्याही हातात ही रोपवाटिका दिल्याने त्यांनीही या क्रांतिकारी निर्णयाचे कौतुक केले. वधु वरांस शुभ आशीर्वाद शेणवड तालुका इगतपुरीचे रहिवासी व आदिवासी समाजात जनजागृती करून एकजुटीसाठी लढणारे शिक्षक गोविंदा रामा गिळंदे व त्यांच्या पत्नी शिक्षिका पार्बता गिळंदे यांचे विशेष कौतुक केले. गिळंदे दांपत्याचा बिरसा मुंडा मेडिकल हबच्या प्रचार प्रसारात व उभारणीत मोठा सहभाग आहे. सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या या दांपत्याच्या उपक्रमाचे इगतपुरी तालुका शिक्षक संघ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.