इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांनी अखेर शेतकऱ्यांचे लक्ष लागलेला नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू झाला आहे. खासदार गोडसे यांचे अथक प्रयत्न, विकासाचा ध्यास व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भविष्याची जाणीव यामुळे फार मोठे यश आले आहे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा असणारा नाशिक सहकारी साखर कारखाना असून याचा लाभ अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी होणार आहे.
गेल्या ९ वर्षांपासून पूर्णतः बंद असलेल्या पळसे येथील नाशिक साखर कारखान्यामुळे ऊसउत्पादक शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांच्या भरवशावर राहावे लागत होते. आता नाशिक कारखान्याचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात बॉयलर अग्नी प्रदीपन, सव्वा महिन्यात ऊस मुळी टाकून गळीत चाचणी व दीड महिन्यातच साखरचे यशस्वी उत्पादन करण्यात आलेले आहे. हा साखर कारखान्यांच्या इतिहासातील एक अद्वितीय, अद्भुत आणि ऐतिहासिक विक्रमच म्हणावा लागेल. या विक्रमामुळे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव आनंदीत झाले आहेत.