इगतपुरीनामा न्यूज, दि. १
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे महाराष्ट्रातील सर्वात अवघड गडांमध्ये अग्रेसर असलेल्या अकोले तालुक्यातील कुलंग किल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्या नियोजनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गडावर कचरा पेट्या आणि सुचना फलक बसवले. हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे कुलंग किल्ल्यावर विविध सूचना फलक लावण्यात आले. आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर कचरा करु नये नम्र विनंती, गडावर दारू पिताना दिसल्यास कडेलोट करण्यात येईल आदी प्रकारच्या सूचना असणारे हे फलक आहेत. शेवटी हुकुमावरून ~ छत्रपतींचे मावळे असा उल्लेख करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने गड-किल्ले असणारे महाराष्ट्र हे राज्य देशात एकमेव असे आहे. राज्याच्या कोपर्या-कोपर्यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. हे जपण्यासाठी हिंदवी स्वराज्य ग्रुपचा प्रयत्न असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येयाने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमने परतवून लावली. स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे, स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे असे रुपेश हरिश्चंद्र नाठे यावेळी म्हणाले. आज अनेक लोक गड किल्यांवर कचरा करतात. दारु पितात यासाठी हिंदवी स्वराज्य ग्रुपचा वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त कुलंग किल्यावर स्वच्छता मोहीम राबवली गेली. यावेळी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक रुपेश नाठे यांनी धनंजय नाठे, पुष्पराज नाठे, गणेश नाठे, प्रणव जाधव, गोकुळ जाधव, आशिष वारुंगसे, सोहम धांडे यांचे विषेश कौतुक केले. संजय कश्यप, अजय कश्यप, प्रमोद पाटील, साहिल माळी, सागर सांगळे, पियुष भोसले, प्रज्वल बनकर, धनंजय नाठे आदी उपस्थित होते.