इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
दुर्घटनेमुळे निर्माण झालेले संकट… कुटुंबाची काळजी… भीतीचे सावट आणि पुढची अनिश्चित दिशा यांनी घेरलेल्या दुर्घटनाग्रस्तांच्या भुकेसाठी गोरख बोडके युवा मंच सरसावले आहे. नाशिकरोड येथे मदत केंद्रातील २०० पेक्षा जास्त दुर्घटनाग्रस्तांना आपुलकीने जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी घास भरवला. यासह विचारपूस करून सर्वांना दिलासा देण्यात आला. संकटांच्या काळात सोबत राहून विविध मदतकार्य करून गोरख बोडके युवा मंचाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. याबद्धल प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गोरख बोडके यांचे कौतुक केले. स्वतः पुढे होऊन गोरख बोडके यांनी प्रवाशांना जेवणाचा आग्रह केला.
संकट लहान किंवा मोठे असले तरी त्यांची व्याप्ती मनामनात घर करते. देशाच्या विविध भागांतील प्रवाशी रेल्वे दुर्घटनेमुळे संकटात होते. याबाबत माहिती समजताच प्राधान्याने सर्वांना जेवणाची व्यवस्था केली. लोकांमध्ये असलेल्या ईश्वराला प्रसन्न करण्याची आणि सेवाकार्य करण्याची संधी भाग्य असल्यावर मिळते.
- गोरख बोडके, जिल्हा नियोजन समिती सदस्य
आज दुपारी लोहशिंगवे गावाजवळ दरभंगा पवन एक्सप्रेसचे ११ डबे घसरल्याची दुर्घटना घडली. ह्या गाडीतील प्रवाश्यांना गोरख बोडके युवा मंचतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जवळपास २०० बाधित प्रवाश्यांना गोरख बोडके युवा मंचतर्फे जेवण देण्यात आले. इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभरात जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचे विविध सेवाकार्य परिचित आहे, रेल्वे दुर्घटनाग्रस्तांना जेवणाची व्यवस्था वेळेत झाल्याने बाधित प्रवाश्यांनी आभार मानले. दुर्घटनाग्रस्त प्रवासी देशाच्या विविध भागांतील असून त्यांची भोजनाची उत्तम व्यवस्था झाल्याने त्यांनी गोरख बोडके यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा प्रशासनाकडूनही श्री. बोडके यांचे कौतुक करण्यात आले. मानवी संवेदना जागृत ठेवून बाधितांशी संवाद साधत त्यांना युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी दिलासा दिला.