नाशिक साखर कारखान्याच्या शुभारंभाने इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांत आनंद : शेतकऱ्यांतर्फे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी मानले खासदारांचे आभार

प्रभाकर आवारी । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक व सिन्नर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असणारा ९ वर्षांपासून बंद पडलेला नाशिक सहकारी साखर कारखाना खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांनी सुरू होत आहे. यामुळे शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारखान्याच्या नुतनीकरण कार्यक्रमाला इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कारखान्याच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

गेल्या ९ वर्षांपासून बंद असलेल्या नाशिक साखर कारखान्यावर अवलंबुन असणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आपला ऊस इतरत्र कारखान्यांना देण्यासाठी प्रयत्न करतांना चांगलीच दमछाक होत होती. उसाला तुरे येऊनही ऊस लवकर तुटत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ बसत होती. मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन बंद असलेल्या नाशिक साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न अखेर सफल झाले. त्याचे नुतनीकरणाचे कामही सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावुन खासदार हेमंत गोडसे यांचे आभार व्यक्त करीत आनंद व्यक्त केला. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, माजी सभापती गोपाळ लहांगे, संपत काळे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम भोर, कारभारी नाठे, वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, पाडळी देशमुखचे माजी सरपंच जयराम धांडे, जानोरीचे भगवान भोर आदींसह इगतपुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!