सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज दि. २८
कोरोनाची साथ सुरू असतांना आजारात केवळ वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू पावलेल्या काशिनाथ भालेराव यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भालेराव यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलांनी उपस्थित नातलग, मित्रमंडळी आणि आप्तस्वकीय यांना वड आणि पिंपळ वृक्षांची अनोखी भेट दिली. ऑक्सिजन अभावी वडिलांचा झालेला मृत्यू धक्कादायक होता. ऑक्सिजन चे महत्व खऱ्या अर्थाने अधोरेखित करणारी ही घटना आमच्यासाठी धक्कादायक होतीच, मात्र त्यातून बोध घेत आम्ही जास्त ऑक्सीजन देणाऱ्या वृक्षांचे वाटप करून वडिलांच्या स्मृती चिरकाल जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, असे भालेराव कुटुंबीयांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याविषयी उपस्थितांचे प्रबोधनही करण्यात आले.
मागील वर्षी कोरोनाच्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असतांना अनेकांचा बळी गेला होता. यात अनेक जण वेळेवर ऑक्सीजन उपलब्ध न झाल्याने दगावले होते. यामध्ये उभाडे येथील प्रगतशील शेतकरी आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते काशिनाथ भाऊ भालेराव यांचेही ऑक्सीजन अभावी निधन झाले होते. मात्र शासनाच्या निर्बंधामुळे त्यांचा दशक्रिया विधीही करता आला नाही. रविवारी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचे उभाडे येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आप्तस्वकीय, नातेवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काशिनाथ भालेराव यांचे पुत्र ज्ञानेश्वर भालेराव, कैलास भालेराव, भाऊसाहेब भालेराव व राजेंद्र भालेराव यांच्या संकल्पनेतून उपस्थितांना पिंपळ आणि वड आदी झाडाच्या रोपट्याचे मान्यवराच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांना पर्यावरण संवर्धन आणि रक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी जि. प. सदस्य उदय जाधव यांच्यासह प्रमोद भोर, नंदू पगारे, विजय कर्डक, आकाश गवळी, नंदू पगारे, अशोक जगताप, राजकुमार भालेराव, भानुदास सुरुडे, महादू भालेराव, वंचित आघाडीचे मिलिंद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.