इगतपुरीनामा न्यूज, दि. २८
नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनतर्फे कळसुबाई शिखर येथे स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये ५० सायकलिस्टसनी पूर्णपणे सहभाग नोंदवला. नाशिक सायकलिस्टस म्हणजे फक्त सायकल चालवणे हा उद्देश नाही, तर नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन सतत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. यात वृक्षारोपण, महिला सबलीकरण, अन्नदान उपक्रम, गरजूंना मोफत सायकल वाटप, व्यायामाचे महत्व पटवून देणे असे अनेक विविध उपक्रम राबवत असतात. नेट झिरो इंडिया अंतर्गत दीड वर्षात अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी नाशिक सायकलिस्टसने सायकलिंग चॅलेज, विविध उपक्रम राबवून ५० लाख कि. मीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. आता लवकरच जुलै अखेर ७५ लाख किमीच्या टप्प्याकडे वाटचाल सुरु आहे. पन्नास लाख किमी महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वात जास्त सायकलिंग करणारा जिल्हा म्हणुन नाशिक ओळखला जात आहे.
५० लाखाची उंची खूप मोठी असुन याच निमित्ताने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणजेच सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर ट्रेक व स्वच्छता अभियान हा नवीन पायंडा राबवला आहे. रविवारी पहाटे नाशिक येथून बसने मार्गस्थ होऊन बारी या गावापासून सकाळी सहा वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने कळसुबाई शिखरावर विविध ठिकाणी स्वच्छतेचा जागर म्हणून स्वच्छतेविषयी जागृती व्हावी या दृष्टिकोनातून बोर्ड लावले. ऊन्हाचा प्रचंड उकाडा असून सुद्धा सायकलिस्ट परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळसुबाई शिखर सर केल्यानंतर कळसूबाईच्या मंदिराजवळ डॉ. मनिषा रौंदळ यांनी “माझा भारत स्वच्छ भारत” ही प्रतिज्ञा सर्व सायकलिस्टस यांना दिली. ट्रेक व स्वच्छता अभियानचे ट्रेक लीडर संजय पवार व रतन अकोलेकर यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. कळसूबाईच्या शिखरापासून प्लॅस्टिकचा कचरा उचलत थेट पायथ्यापर्यंत सायकलिस्ट यांनी गोळा करून आणला. जवळपास सहा गोण्या इतका प्लास्टिक जमा केलेला कचऱ्याची विल्हेवाट लावली. यावेळी सर्व सायकलिस्ट यांना नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा जेष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, उपाध्यक्ष किशोर माने, विजय गडाख, अनुराधा नडे यांनी मार्गदर्शन केले.