इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन इगतपुरी पंचायत समितीच्या माजी सभापती जयाताई रंगनाथ कचरे यांनी महिलांसाठी खुशखबर दिली आहे. इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील ठेभांडी वस्तीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे आणि पाणी टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन केले. या योजनेसाठी माजी सभापती जयाताई कचरे यांनी स्वतःच्या निधीतुन खर्च केला आहे. इगतपुरी पंचायत समिती निवडणूक काळात निवडणूक प्रचारावेळी माजी सभापती जयाताई कचरे यांनी ठेभांडी वस्तीतील महिलांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबाबत महिलांनी त्यांचे आभार मानले.
महिलांना पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. इगतपुरी तालुक्यातील अधरवडच्या ठेभांडी वस्तीतील महिलांना पाण्याची समस्या होती. माझ्या कार्यकाळात येथील महिलांना पाणी योजना देऊन प्रश्न सोडवू असा शब्द दिला होता. आता येथे पाणी योजना साकारत असल्याने आत्मिक आनंद झाला. यापुढेही ह्या भागातील समस्या सोडवण्याचे वचन देते.
- जयाताई रंगनाथ कचरे, माजी सभापती पंचायत समिती इगतपुरी
पाणी योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी अधरवड येथील जेष्ठ शिवसैनिक राजाराम पाटील बऱ्हे, सरपंच डमाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप महाले, सागर राक्षे आदींसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माजी सभापती जयाताई रंगनाथ कचरे यांनी त्यांच्या पंचायत समिती वित्त आयोग निधीतुन निधी उपलब्ध करुन दिल्याबद्धल नागरिकांनी आभार मानुन त्यांचा सत्कार केला.