सुनील शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या घोटीतील धरणीमाता वृक्ष संगोपन फाउंडेशनने घोटीजवळील डोंगरावर लागवड केलेल्या तब्बल शेकडो वृक्ष अज्ञात व्यक्तीने डोंगराला लावलेल्या आगीत खाक झाले. यामुळे वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. या डोंगराला आग लावू नये यासाठी शासनस्तरावरून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी धरणमाता वृक्षसंवर्धन फाउंडेशनने केली आहे.
घोटीजवळ न्हायडी डोंगर असून वनविभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या डोंगरावर हरितक्रांती आणण्यासाठी घोटीतील धरणीमाता वृक्षसंवर्धन फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेत आहे. वृक्षलागवडी बरोबर वृक्षसंवर्धन करण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने डोंगरावर पाणी नेऊन ठिबकद्वारे वृक्षांना पाणी दिले जाते. यावर्षीही मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली असताना काही अज्ञात समाजकंटकांनी या डोंगराला आग लावल्याने अनेक खाक झाली आहेत. याबाबत धरणीमाता वृक्षसंवर्धन फाउंडेशनचे पदाधिकारी धीरज गौड, राजू राखेचा, संतोष वाकचौरे, संजय देशपांडे, विनायक शिरसाट, पूनम राखेचा आदींनी संताप व्यक्त केला आहे. फाउंडेशनतर्फे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन शासनस्तरावरून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याची माहिती धीरज गौड यांनी दिली.