२८ वर्षांनंतर वाडीवऱ्हे येथील माध्यमिक विद्यालयाच्या ६० विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न : गोरख बोडके यांच्या पुढाकारातुन झाली विचारांची देवाणघेवाण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

बालपणापासून एकमेकांच्या सोबतीने शाळेचे धडे गिरवणारे मित्र म्हणजे संपूर्ण आयुष्यातली खरी कमाई…! चांगल्या वाईट सवयी, अभ्यासाचा छंद, विविध स्पर्धा, खोड्या, मस्ती, कौतुक आणि धक्काबुक्की यांचे विविध प्रसंग नेहमीच दृष्टिपटलावर तरळत असतात. मजेशीर आणि खोडकर जिंदगी म्हणजे विद्यार्थीदशा..! जेवणाचा डबा एकत्र खाण्यातली मजा… सहलीत केलेली धमाल.. शिक्षकांचे खाल्लेले धपाटे असे अनेकानेक दुर्मिळ क्षण सुद्धा आयुष्यभर प्रत्येकाला ऊर्जा देतात. वाडीवऱ्हे येथील माध्यमिक विद्यालयात १९९४ मध्ये दहावीला शिकणारे विद्यार्थी सुद्धा ह्याला अपवाद नाहीत. २८ वर्ष दहावी सुटायला आणि एकमेकांपासून लांब व्हायला सुद्धा झाली. करिअरचा ध्यास, नंतर कौटुंबिक व्याप आणि नोकरी व्यवसायाचे जंजाळ मागे लागले तरी २८ वर्षात २८ मिनिट सुद्धा भेटी झाल्या नाही. अर्थातच एवढ्या वर्षाचे ऋणानुबंध २८ वर्षात तुटले मात्र अजिबात नाही.

सर्वांच्या मनात भेट व्हावी, छान गप्पा व्हाव्या, एकत्र डब्बा खावा आणि हजेरीपत्रकावरील नाव पुकारल्यावर Yes Sir चा पुकारा करून १९९४ च्या दहावीच्या वर्गात जावे असे सर्वांना वाटते. वर्गात बसल्यावर संसाराचा गाडा, मुलेबाळे, नोकरी व्यवसाय आणि सगळ्या आभासी दुनियेच्या आईचा घो करून फक्त आणि फक्त बालपण अनुभवले पाहिजे. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, युके मेटल्सचे युनिट हेड तानाजी कातोरे, अनिल टिळे, रतन नाठे यांच्या संकल्पनेतून माध्यमिक विद्यालयातील १९९४ ची दहावीची बॅचचे स्नेहसंमेलन आज संपन्न झाले. आठवणीतील हिंदोळ्यावर पुरेपूर आनंद घेण्यासाठी ६० माजी विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे ज्या गुरुवर्यांनी ह्या सगळ्यांना घडवलं असे अनेक गुरुवर्य आपला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला 1994 च्या दहावीचे 60 विद्यार्थी आले होते. या विद्यार्थ्यांमधील अनेकजण विविध क्षेत्रात यशवंत झालेले आहेत. आपल्या आठवणी उजळवण्यासाठी शिक्षक सुद्धा आले होते. एकंदरीत २८ वर्षांनी बालपणाच्या अनोख्या मस्तीने भारून गेलेले सगळेच्या सगळे क्षण ताजेतवाने होण्यासाठी आजचे स्नेहसंमेलन आणि दिलखुलास गप्पा उपयुक्त ठरल्या असे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!