प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
इगतपुरी तालुक्यातील वीज आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते संदीप गुळवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी निवेदन दिले. याबाबत राज्यपालांबरोबर सकारात्मक चर्चाही झाली असल्याची माहिती इगतपुरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली. इगतपुरी तालुक्यातील हळदीच्या शेतीला भेट देण्यासाठी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आले होते. सुरवातीला इगतपुरी तालुक्यात आल्यानंतर विश्रागृहावर राज्यपालांचे आगमन झाल्यानंतर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते संदीप गुळवे, इगतपुरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत केले.
यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी मतदारसंघाबाबत माहिती दिली. आमदार खोसकरांच्या नावाबाबत राज्यपालांनी ‘हिरामणी खुषकर’ असे संबोधित नवीन नामकरण केले. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर सध्या विजप्रश्नाचे मोठे संकट असुन यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे सांगत याप्रश्नी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इगतपुरी तालुक्यातील बहुतांश क्षेत्र हे शासकीय प्रकल्पांसाठी संपादित झाल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त इगतपुरी तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघावा आदी प्रश्नांसह राज्यपालांशी सकारात्मक चर्चा घडली. याबाबत तोडगा काढण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्याबाबत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते संदीप गुळवे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लेखी निवेदन दिले अशी माहिती काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी दिली.