इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजापर्यंत पोहचवले गेले नाहीत. त्यामुळे ते विशिष्ट समाजाचे व धर्माचे राहिले. अभ्यासक्रमामध्ये दलितांचे कैवारी असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे बाबासाहेब विद्यार्थ्यांना समजले नाही असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या “आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या पुस्तकाच्या परिसंवाद, राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी, ( भंडारदरा डॅम )येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे, लाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक डगळे, प्रा. अनिल डगळे, प्रा. नामदेव बांगर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ गभाले, विकास पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना रोंगटे म्हणाले की, “आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक दलित-आदिवासी यांच्यातील गैरसमज दुर करण्यासाठी उपयुक्त आहे. समाजामध्ये डॉ. बाबासाहेब सर्वांचेच असून ते कोणा एका जातीचे व धर्माचे नाहीत. याचे संदर्भासह दाखले देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ. अशोक डगळे यांनी पुस्तकाबद्दल माहिती देवून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा असतांना विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
प्राचार्य डॉ. रोंगटे यांच्या अध्यक्षीय भाषणात तुकाराम रोंगटे यांच्या सोबतच्या बालपणातील आठवणींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना संघर्षांची आठवण करुन त्यांच्या संशोधनाचे कौतुक केले. प्रा. अनिल डगळे यांनी पुस्तक सर्व स्तरातील लोकांनी वाचून या पुस्तकातील अंतर्भूत काही बाबींचा परिसंवादाच्या स्वरुपाने उल्लेख केला. महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्वाती बांगर हिने पुस्तकाबद्दल आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील संदीप काळे, शहाजहान मुलानी, महेश पाडेकर, देशमुख, अनिल खाडे, रवींद्र मेंगाळ आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. नामदेव बांगर यांनी केले. सूत्रसंचालन कोटकर सर यांनी केले.