इगतपुरीनामा न्यूज दि. ०४ : दोन वर्षे सुरू असलेला कोरोना संसर्ग अजून तरी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट त्यानंतर कोरोनाचे नवनवीन प्रकार समोर येत असल्याने अजूनही परिस्थिती म्हणावी तितकी स्थिर झालेली नाही. तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीच्या खंडानंतर नुकत्याच शाळा नियमित सुरू झालेल्या असतांनाच आता पुन्हा नव्याने आलेल्या ओमिक्रॉन या कोरोना च्या नव्या प्रकाराने मुंबई सह राज्याच्या काही भागात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मध्यंतरी तीन आकडी असणारी राज्याची रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून हे वाढते आकडे धास्ती निर्माण करणारे आहेत.
मागच्या वेळीचा अनुभव लक्षात घेता रुग्णसंख्या वाढल्याने नुकत्याच सुरळीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागतात की काय अशी धास्ती पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात निर्माण होवू पाहत आहे. तब्बल दीड वर्षाच्या कालावधीत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात का असेना पण शैक्षणिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात संसर्गाचे प्रमाण कमी असतांनाही आणि परिस्थिती नियंत्रणात असतांनाही सरसकट शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा संसर्ग वाढू लागल्याने पुन्हा तसाच सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला तर विद्यार्थ्यांचे पुन्हा शैक्षणिक नुकसान अटळ आहे. त्यामुळे एकूण सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेवून किमान ग्रामीण भागात तरी शाळा सरसकट बंद न करता स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच याबाबतीत निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा पालक आणि शिक्षक बाळगून आहेत.
दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत, आणि अशा परिस्थितीत पुन्हा शाळा बंद झाल्यास त्याचा थेट परिणाम या विद्यार्थ्यांच्या निकालावर आणि पर्यायाने त्यांच्या भविष्यावर होणार आहे. दरम्यान मुंबईतल्या शाळा काल पासून बंद करण्यात आल्याने राज्याच्या इतर भागातही लवकरच हा निर्णय कायम केला जावू शकतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. सरसकट एकच निर्णय घेता स्थानिक परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्यावेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल असा निर्णय घेतला जावू नये अशी अपेक्षा ग्रामीण भागातील पालक आणि शिक्षक बाळगून आहेत.