इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
नाशिक शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. असे असले तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या रूंदीमध्ये फारसा बदल झालेला नाही. परिणामी शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहराचा समतोल विकास साधण्यासाठी आणि भविष्यात उद्भवणारी वाहतुक कोंडीची समस्या लक्षात घेता शहराच्या अंतर्गत रिंगरोड होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे शहराच्या अंतर्गत रिंगरोड होणे कामी महानगरपालिकेने ठराव करून सदर ठरावाचा प्रस्ताव मान्यतेसाठी तातडीने विशेष बाब म्हणून राज्य शासनाकडे पाठवावा अशा सुचना खासदार हेमंत गोडसे यांनी महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांना केल्या आहेत.
गेल्या दशकभराच्या काळात नाशिक शहराचा वेगाने होत आहे. देशभरात नाशिक शहर धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने शहरात बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या, आधीच शहरातील नागरिकांच्या वाहनांची संख्या मोठी असून त्यात बाहेरील राज्यातील मोठी आहे. भाविकांच्या येणाऱ्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीवर मोठा ताण पडत आहे. वाहनांची संख्या प्रचंड मोठी होत असल्याने शहरातील चौकाचौकात वाहतुकीची पावलोपावली कोंडी होत आहे. यामुळे नागरिक तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. यातूनच सतत होणाऱ्या अपघातांमुळे हकनाक नागरिकांचा बळी जात असून अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. भविष्यात होणारी वाहतुकीची भीषण कोंडीची समस्येवर मात करण्यासाठी आज खासदार गोडसे यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली.
पुढील पाच वर्षांत नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार असल्याने तीन वर्षांनंतर देशभरातील साधु महंतांची ये-जा शहरात वाढणार आहे. यामुळे भविष्यात शहरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजनेचे नियोजन आत्ताच होणे गरजेचे असल्याचे मत खासदार गोडसे यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्या बोलतांनी व्यक्त केले. याबरोबरच शहरात भविष्यात होणारी वाहतुकीची भीषण कोंडी थांबविण्यासाठी शहर अंतर्गत ३६ मीटर रूंदीचा रिंगरोड होणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करत महानगरपालिकेने रिंगरोडच्या प्रस्तावाला मान्यता देवून सदर प्रस्ताव मान्यतेसाठी तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा अशा सुचनेचे पत्र श्री. गोडसे यांनी आयुक्तांना दिले आहे. खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असून नाशिक शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी रिंगरोड अत्यावश्यक असल्याचे लक्षात आल्याने याबाबत नगरनियोजन व बांधकाम विभागाच्या प्रशासनाची लवकरच बैठक बोलवून सविस्तर चर्चा करून रिंगरोडविषयी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी खासदार हेमंत गोडसे यांना दिली आहे.