इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
नव्या सदृढ समाजाची जडणघडण, सुसंस्कृत पिढीची निर्मिती आणि दूरगामी चांगले फळ देणाऱ्या अध्यात्माची पेरणी स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात होत आहे. बाल वारकऱ्यांना घडवणाऱ्या ह्या संस्थेसाठी आगामी काळात सभामंडप देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी दिला. बलायदुरी येथील स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेला गोरख बोडके यांनी स्वखर्चाने हायमास्ट दिला. त्याचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. वारकरी समाजाच्या माध्यमातून मोठी जनसेवा होत असल्याने ह्या कामांसाठी काही मदत लागली तर हक्काने सांगा असे माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण आपल्या मनोगतात म्हणाले. गोरख बोडके यांच्यामुळे आमच्या संस्थेला भक्कम आधारस्तंभ मिळाला असून आमच्या समस्या आता सुटायला मदत होईल असा विश्वास स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा विजय महाराज चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी माजी उपसभापती विष्णू चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती भगत, पत्रकार भास्कर सोनवणे आदींसह ग्रामस्थ आणि बाल वारकरी उपस्थित होते.