महिलांची सरपणासाठी पुन्हा जंगलाकडे धाव !: गॅस सिलिंडर दरवाढीचा परिणाम ; सबसिडीही बंद

तुकाराम रोकडे | इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

प्रतिदिन पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या सतत दरवाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली आहे. गॅस सिलेंडरचे वाढते दर सर्वसामान्यांना पेलवत नसल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी पुन्हा एकदा जंगलाची वाट धरली आहे. त्यामुळे महिलांना थंडी गारठ्यात जंगलात वणवण करत जळणासाठी सुके सरपण मिळविण्यासाठी शोधा शोध करावी लागत आहे. मात्र, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या महिलांना सरपण मिळवण्याचा पर्याय सोप्पा वाटत असल्याने त्यांनी जंगलाकडे धाव घेतली आहे.

कोरोना संसर्गामुळे ठप्प असलेले उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू झाले असले तरी आर्थिक मंदीचे सावट कायमच असल्यामुळे रोजगाराची समस्याही भीषण रूप घेत आहे. अशातच सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत ९१० रुपयांवर पोहचली असून त्यात ६० रुपये आगाऊ गाडीभाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे सिलेंडरचा खर्च एक हजाराच्या आसपास वाढला आहे. अशा परिस्थितीत गॅस सिलिंडर घेणे परवड नसल्याने ग्रामीण भागातील जनता पुन्हा चुलींचा आधार घेत आहे. सरपणासाठी महिला जंगलात वणवण भटकंती करत असल्याचे चित्र देवगांव परिसरात पाहायला मिळत आहे.

उज्ज्वला योजनेतून गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर आणि शेगडी सरकारकडून मिळाली. परंतु, ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना सिलेंडर भरण्यासाठी पैसेच नसल्याने सिलेंडर रिफिल करता येत नाही. त्यामुळे उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश बाजूला पडला आहे. गॅसही रिफिल करता येत नाही आणि शिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेलही मिळत नसल्याने महिलांना सुके लाकूड व गवऱ्यासाठी जंगलात वणवण फिरावे लागत आहे.

ताळेबंदीच्या काळात रेशन दुकानातून उपलब्ध करून दिलेल्या धान्यांमूळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला. स्वस्त धान्य दुकानातून धान्यांसह रॉकेलही मिळत होते. परंतु, गॅसचा लाभ घेतल्यामुळे   दुकानातून मिळणारे रॉकेल बंद झाले. त्यामुळे सिलेंडरच्या वाढत्या किंमती ग्रामीण भागातील गरीब लोकांना परवडत नसल्याने चूल पेटवण्यासाठी सरपणाच्या शोधात महिलांना जंगलाकडे धाव घ्यावी लागत आहे. उज्वला योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहोचली मात्र वाढत्या दरामुळे व आर्थिक परिस्थितीमुळे सिलेंडर घेणे कठीण झाले आहे. त्यातच शासनाने केरोसीनवर बंदी आणल्याने खेड्यातील महिला गोवऱ्या व सरपणाकडे वळल्या आहेत.

 १०० रुपयात उज्वला गॅसची जोडणी मिळत असल्याने सुरुवातीच्या काळात या योजनेला उत्तम प्रतिसादही मिळाला. परंतु, सिलेंडरच्या किमतीतील दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चुलचं बरी अशी भावना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांमध्ये झाली आहे. रेशनकार्डवर मिळणारे केरोसीन सुद्धा बंद झाल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक बजेट बिघडले असून पुन्हा गोवऱ्या व सरपणावर चुली पेटत असल्याचे वास्तव आहे. आरक्षित जंगलातून चुलीसाठी सरपण मिळणे अवघड असले, तरी जंगलतील रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या लाकूडफाटा विनापैशांच्या असल्याने ग्रामीण कष्टकरी महिला जमा करतांना दिसतात.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!