इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या मोडाळे ग्रामपंचायतीला इगतपुरी तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला आहे. १० लाखांचा पुरस्कार नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी प्रदान करण्यात येणार आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत तालुकास्तरावर मोडाळे ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. शिरसाठे जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या नियमित मार्गदर्शनाने १० लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. ग्रामविकासाचा ध्यास घेऊन अभूतपूर्व विकास, विविध योजना आणि निसर्गसंपन्न मोडाळे गावाची निर्मिती गोरख बोडके यांनी केलेली आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनीही गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनानुसार गावाला विकसित करण्यात हातभार लावलेला आहे. स्मार्ट गावाचा पुरस्कार मिळणार असल्याने ग्रामस्थांसह इगतपुरी तालुक्यात कौतुक सुरू आहे.
आर. आर. ( आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना अर्थात स्मार्ट ग्राम योजनेसाठी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, आडवण, कृष्णनगर, कुशेगाव, धार्णोली, धारगाव, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा धानोशी, वाकी बिटुर्ली, कऱ्होळे, पिंपळगाव घाडगा, मुकणे, देवळे, बेलगाव कुऱ्हे, वाडीवऱ्हे, शिरसाठे ह्या १७ गावांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. या निकषात जास्तीत जास्त गुण मिळवणाऱ्या तालुक्यात प्रथम येणाऱ्या गावाला १० लाख रुपये पुरस्काराची ही योजना आहे. त्यात इगतपुरी तालुक्यात मोडाळे ग्रामपंचायत प्रथम क्रमांक म्हणून पात्र ठरली असून जिल्ह्यातील १५ स्मार्ट ग्रामपंचायतीमध्ये मोडाळे ग्रामपंचायतीचा समावेश झाला आहे. पंडित दीनदयाळ योजनेसाठी ह्या ग्रामपंचायतीने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये निवड झाल्यास थेट पंतप्रधानांकडून पुरस्कार मिळणार आहे. मोडाळे गावाला विकसित करण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके हे नेहमीच पुढाकार घेतात. आतापर्यंत लाखो रुपयांचा विविध योजना परिणामकारकपणे राबवून त्यांनी गावाला राज्याच्या नकाशावर आणले आहे. गोरख बोडके यांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे पुन्हा एकदा मोडाळे गावाला स्मार्ट गाव पुरस्कार मिळाला आहे.
मोडाळे गावाला बदलून टाकण्यासाठी आवश्यक त्या सर्व योजनांची परिपूर्ण अंमलबजावणी आम्ही सर्वांनी केली. ग्रामस्थांच्या लक्षणीय सहभागातून अनेकानेक विकासकामे आम्हाला करता आली. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून मोडाळे गावाला स्मार्ट ग्राम योजनेचा १० लाखांचा पुरस्कार मिळणार असल्यामुळे माझे काम खऱ्या अर्थाने सार्थकी लागले. पंतप्रधानांकडून मिळणाऱ्या पं. दीनदयाळ योजनेच्या पुरस्कारासाठी मोडाळे, शिरसाठे गावांनी भाग घेतला असून उल्लेखनीय दमदार कामगिरी केली आहे. दोन्ही गावकऱ्यांचे अभिनंदन करतो.
- गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य