भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
“चार आण्यांची कोंबडी आणि बारा आण्यांचा मसाला” अशी म्हण सगळीकडे प्रचलित आहे. अर्थातच कोंबडीला शून्य किंमत देऊन तिचे मूल्य घटवण्यात आले आहे. असे असले तरी एक कोंबडी भल्याभल्यांना चांगलीच नडु शकते याची साक्षात प्रचिती इगतपुरी शहरात आली आहे. आजपर्यंत कोणीही न केलेला पराक्रम एका १०० रुपयांच्या कोंबडीने करून दाखवला आहे. आणि हो…अजूनही ही कोंबडी बरेच चमत्कार करून दाखवण्याकडे वाटचाल करीत आहे. इगतपुरी तालुक्याच्या वन खात्याने ह्या कोंबडीला “वनदुर्गा” असे विशेष नाव देऊन टाकले आहे. एक कोंबडी चक्क ४ बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करू शकते ह्याचे ऐतिहासिक उदाहरण इगतपुरीत अनुभवता येईल.
गोष्ट अशी आहे, इगतपुरी शहरात गेले काही दिवस बिबट्यांचा वावर वाढला आहे, साहजिकच वनविभागासमोर बिबटे पकडण्याचे आव्हान उभे राहिले! बिबट्यासाठी पिंजरा लावण्याचं ठरलं, पण पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवायचं काय? आणि मग यासाठी धावून आली ती “वनदुर्गा”! अर्थात वरती उल्लेख असलेली कोंबडी! होय होय, कोंबडीच! या एका कोंबडीने आतापर्यंत तब्बल ४ बिबट्यांची “शिकार” केलीय! हिच्या मोहात पडून चौघेच्या चौघे बिबटे पिंजऱ्यात अडकले. शिवाजीनगर परिसरात पहिल्यांदा पिंजरा लावला त्यावेळी ही कोंबडी या पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून ठेवण्यात आली होती, त्यानंतरच्या तीन वेळा लावलेल्या पिंजऱ्यातही तीच कोंबडी भक्ष्य म्हणून ठेवली गेली आणि आता आज पाचव्यांदा पिंजरा लावला तेंव्हा सुध्दा हीच वनविभागाच्या मदतीला धावून आली आहे. आधीच्या चार अनुभवांवरून लवकरच पाचवी शिकार सुध्दा पिंजऱ्यात अडकल्याशिवय राहणार नाही असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान क्षुल्लक वाटणारी पण सध्या फॉर्मात असणारी ही कोंबडी सध्या इगतपुरीत चर्चेचा विषय ठरली आहे. इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपाल भाऊसाहेब राव, वनरक्षक फैजअली सय्यद, जी. डी. गांगुर्डे, सुरेखा गृहाडे, जाधव भाऊसाहेब, मुज्जू शेख यांनी राबवलेला कोंबडी फार्म्युला चांगलाच यशस्वी झाला आहे.