इगतपुरीनामा न्यूज ता. २४ : “गाव तेथे वाचनालय” या वाचन चळवळीअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरमच्या हरणगाव येथील नवव्या अभ्यासिकेचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे आणि रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. ज्या युगात लोक सरकार किंवा सामाजिक संस्थाकांडून भौतिक सुखांची मागणी करतात त्याच युगात आदिवासी गावं सोशल नेटवर्किंग फोरमकडे वाचनालय मागत आहेत ही सुखावह बाब आहे हे कांबळे सरांचे बोल आम्हाला खूप बळ देऊन गेले. डेल्टा फिनोकेमचे दादासाहेब देशमुख कुटुंबीयांनी या वाचनालय उभारणीचा आर्थिक भार उचलला आहे. सामाजिक भान जपणाऱ्या अशा व्यक्तींमुळेच दुर्गम भागात वाचनालये सुरु करण्याची एक शृंखला सोशल नेटवर्किंग फोरम निर्माण करू शकते आहे.
डेल्टा फिनोकेमचे संचालक जय देशमुख, कॅलिफोर्नियाहून डॉ. स्वप्ना परीघ, गटशिक्षणाधिकारी, श्री निवृत्ती शिवाजी जाधव, श्री किरण विनायक भरसट, श्री निवृत्ती पवार पोलीस पाटील, श्री सी. एम. जाधव, श्री मनोहर टोपले, श्री धनंजय चव्हाण , श्री. मनमोहन जाधव, श्री हिरामण भोये, सौ. वर्षाताई जेजुरकर, विजय भरसट, रामदास शिंदे आणि गावातील सर्व एसएनएफ ग्राम समन्वयक यांचे या कामात मोलाचे योगदान आहे.
“निसर्ग माणसाला डोळे देत असला तरी पुस्तक माणसाला सकारात्मक दृष्टी देत असतात. माणूस म्हणून जगण्यासाठी पुस्तक महत्वाचे आहेत म्हणून सोशल नेटवर्कींग फोरमने सुरू केलेली गाव तेथे वाचनालय ही चळवळ कौतूकास्पद आहे. पुस्तक हे माणसाला दृष्टी देण्याचे काम करतात. आदिवासी समाज हा या देशाचा मूल निवासी आहे आणि त्यांची प्रगती होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी पुस्तक आणि वाचन हाच सर्वोत्तम मार्ग आहे.” – उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक
“दोन महिन्यापूर्वी एका एसएनएफ वाचनालयाला प्रत्यक्ष भेट दिली होती. या उत्तम संकल्पनेला हातभार लागावा यासाठी त्वरित दोन वाचनालयांसाठी साडेतीन लाख रुपयांची मदत केली. भविष्यात वाचनालयातून उज्वल पिढी निर्माण होईल यात शंका नाही.” – दादासाहेब देशमुख
सोशल नेटवर्किंग फोरम च्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या मदतीने आदिवासी भागात सुरू झालेली ही वाचनालय चळवळ वाढते आहे याचा नक्कीच आनंद आहे. आदिवासी भागात इतर बऱ्याचश्या भौतिक सुविधांची वाणवा असतांनाही युवकांनी वाचनालयाची मागणी करणे ही सामाजिक सुधारणांची नांदी आहे, फोरमच्या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच सुधारणा करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. नवयुवक भौतिक सुविधांपेक्षा वाचनालयाला प्रथम प्राधान्य देत आहेत ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. – प्रमोद गायकवाड, अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम