इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी नगर परिषद हद्दीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या तळेगाव तलावाच्या सांडव्याला १० ठिकाणी तडे पडले आहेत. त्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित खाते अनेक वर्षांपासून वाया जाणाऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या तलावाची त्वरित डागडुजी करून दररोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवावे अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र देण्यात येणार आहे. पाणी गळती थांबण्यासाठी त्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात जेणे करुन भविष्यात पाणी टंचाई होणार नाही असे इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी सांगितले.
तळेगाव धरणाची निर्मिती झाल्यापासून आतापर्यत कुठल्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही. धरणाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्याला गळती लागली असून 12 ते 15 ठिकाणी लिकेज आहे. त्यातून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इगतपुरी नगरपरिषदेने याकडे लक्ष द्यावे. या धरणाची तातडीने डागडुजी करावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
- सुमित बोधक, इगतपुरी शहराध्यक्ष मनसे
ह्या तलावाद्वारे इगतपुरीला पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात नगरपालिकेचा तलाव आटल्यानंतर याच तलावावर इगतपुरीकरांची पाण्याची भिस्त अवलंबून आहे. पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरीत आजही आठवड्यातून केवळ तीनदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातच मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने भविष्यात पाणी टंचाईची मोठी समस्या उभी राहू शकते. 41.24 द.ल.घ.फु क्षमता असलेला हा तलाव 1985 ला तयार करण्यात आला. 1987 मध्ये महिंद्रा कंपनीला प्रथम पाण्याचे कनेक्शन देऊन पाणी वाटपाला सुरवात करण्यात आली. सध्या हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात असुन इगतपुरी नगर परिषदेला पाणी पुरवठा केला जातो.