लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा
इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातल्या एका पान टपरीवर एक शाळकरी मुलगा पान मसाला घेतांना माझ्या एका शिक्षणप्रेमी मित्राला दिसला ! त्यानंतर त्याच शिक्षणप्रेमी मित्राने शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे का ह्याची पडताळणी करायचे ठरवले. इगतपुरी तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात त्याने सूक्ष्म सर्वेक्षण केल्यावर अनेक धक्कादायक निष्कर्ष उघड झाले. हे वास्तव स्वीकारून काय करायला हवे याचा घेतलेला हा परामर्ष...!
शालेय पोषण लगेच सुरू करा
शालेय पोषण सही शिक्षण या नावाने शासनाने केलेल्या योजनेमुळे तळागाळातील तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे कुपोषण तसेच BMI कमी झालेला दिसुन आला आहे. मात्र शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे कुपोषण वाढत आहे. सर्व मुलांच्या वजनात कमालीची घट झाली असून आता शालेय पोषण आहार देण्याची अत्यावश्यकता आहे. यासह शिक्षणाचा रोजचा खुराक सुद्धा तितकाच गरजेचा आहे हे ध्यानात घ्यावे.
ऑनलाईन शिक्षण खरंच विद्यार्थी घेत आहेत का ?
बोटावर मोजता येणाऱ्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, त्यातही शिक्षक मित्र Whatsapp ग्रुपद्वारे आणि अन्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शैक्षणिक माहिती पाठवत आहेत. परंतु विद्यार्थी आपल्या वयाच्या क्षमतेनुसार किती वेळ ऑनलाईन शिक्षण घेत आहे ? याबाबत मात्र विद्यार्थी शिक्षण घेणाच्या नावाखाली मोबाईलवर गेम आणि इतर व्हिडिओ पाहण्यात मग्न आहेत. शिक्षण राहिले बाजूला आणि विद्यार्थी मात्र भुलभुलैया असणाऱ्या मोबाईलमध्ये सगळं भान विसरून दंग झाले आहेत. पालकांच्या समोर शिक्षणाचे नाट्य करत असतांना पालकांची जगण्याची लढाई सुरू आहे. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना वळणावर आणणे अनन्यसाधारण महत्वाचे ठरते. यासाठी शाळांची बंद कवाडे तातडीने उघडायला हवीत.
शासन आदेशाविना विद्यार्थी शाळेत
शाळेविषयी गुरूजनांविषयी प्रचंड लळा असल्यामुळे गुरुजी शाळेत आल्यावर विद्यार्थी शाळेत येतातच. परंतु शाळेत आल्यावर विद्यार्थ्याला शाळेच्या आवारात खेळतांना काही दुखापत झाल्यास शिक्षकांना मात्र पालकांच्या वेगळ्याच आणि नको त्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी विद्यार्थी मात्र शाळा कधी उघडतात ह्याची वाट पाहत आहेत. ह्या शाळेचा लळा कायम ठेवण्यासाठी शासन कृतिशील असावे अन्यथा विद्यार्थी मनाने शाळा शिकण्याऐवजी फक्त देहाने शाळेत येतील अन पुढची पिढी बरबाद होण्याचे स्थित्यंतर वाढेल.
विद्यार्थ्याच्या चांगल्या सवयींना लगाम
दररोज शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक विषयांबरोबरच खेळ, क्रीडा या विषयांतुन शिक्षण घेत अनेक चांगल्या सवयी लागतात परंतु, शाळा बंद असल्यामुळे मात्र विद्यार्थी आळशी बनत चालला आहे. मोबाईलमुळे जागरण, टाईमपास, व्यसन, पालकांना उलटून बोलणे, धिंगाणा, हट्ट असे अनेक दुष्परिणाम मात्र विकोपाला गेले आहेत. अभ्यास करण्याचा मात्र सर्वच विद्यार्थ्यांना विसर पडला आहे. पाढे म्हणण्याऐवजी मुलांना टीव्हीवरच्या मालिकांची नावे सुद्धा पाठ असल्याचे दिसून आले आहे. ह्यावर एकमेव उत्तर आहे ते म्हणजे जलदगतीने शाळा सुरू व्हाव्यात.
विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या समस्या
रिकामं मन म्हणजे सैतानाचा कारखाना असतो हे जितकं सत्य आहे अगदी त्याप्रमाणेच, विद्यार्थी निष्क्रीय होत चालला आहे. त्यात ऑनलाईन शिक्षणामुळे डोळ्यांच्या त्रासाच्या समस्या, लेखनाच्या सवयी कमी होणे, पाठांतर, तसेच विद्यार्थ्यांमध्ये मुल्यांची रुजुवात होण्याच्या समस्या वाढत आहेत. हे सगळं पुन्हा हवं असेल तर यासाठी शिक्षकांना किमान 2 वर्ष तरी मागे जावे लागेल. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची सदृढ पिढी भस्म होतांना पाहण्याचे दुर्दैव शिक्षकांना सोसावे लागते आहे.
उपाययोजना काय कराव्या ?
हे सगळं थोपवण्यासाठी जलदगतीने शक्य तितक्या लवकर सगळ्या शाळा सुरूच केल्या पाहिजेत. म्हणजेच इयत्ता १ ली पासुन सर्व वर्गाच्या शाळा दिवसभर नियमित वेळेत भरवल्या पाहिजेत. शालेय पोषण आहार योजनेची विनाविलंब अंमलबजावणी सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पोषण नाही तर शिक्षण नाही. यासाठी शिक्षणप्रेमी नागरिक, जागरूक नागरिक, राजकीय पदाधिकारी आदींनी उठाव करायला हवा. यासाठी प्रयत्न झाले तर आगामी ५० वर्ष मागे जाणारी पुढची पिढी भस्मसात होण्यापासून वाचू शकेल. अन्यथा हीच चिमुकल्या विद्यार्थ्यांची पिढी आपल्या कोणाला आयुष्यभर माफ करू शकणार नाहीत. आपल्या नागरिकांना जिंदगीभर शिव्या देऊन हेच विद्यार्थी म्हणतील की, आमच्या पालकांनी आमच्या शिक्षणासाठी आग्रह न धरल्याने आम्ही बरबाद झालो…!