वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
इगतपुरी तालुक्यातील कसारा घाटाला आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे व भावली धरणाला क्रांतीकारक रायाजी ठाकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली कसारा घाटात रॅली आयोजित करण्यात आली. ह्या आंदोलकांना उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत पथवे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस हवालदार विजय रूद्रे, राजेश चौधरी, सचिन मुकणे, सरला भगत व रूट कंट्रोल फोर्स यांनी कसारा घाटात जाऊन अटक केली. याप्रकरणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव व त्यांचे १० सहकारी यांच्यावर इगतपुरी पोलिस ठाण्यात कोरोनाचे नियम न पाळणे, गर्दी जमा करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी आंदोलकांना ताब्यात घेऊन सायंकाळी सोडण्यात आले.
आदिवासी बांधवांच्या रक्षण करताना अनेक क्रांतिकारक शहीद झाले. त्याच लढ्यातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व क्रांतिकारक राया ठाकरे यांच्या सहकाऱ्यांना जिवंत फासावर लटकविण्यात आले. या आदिवासी क्रांतिकारक यांचा रक्तरंजित इतिहास जिवंत ठेवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाला राया ठाकर व कसारा घाटाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असे नामकरण करावे. या मागणीसाठी आह दुपारी चारचाकी व दुचाकींवर रॅली काढण्यात आली होती. ही रॅली रोखून इगतपुरी पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेत इगतपुरी पोलीस ठाण्यात आणले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह संदीप गवारी, राजू गांगड, हेमंत पवार, अंकुश भस्मा, विवेक गवारी, दीपक गवारी, संदीप गवारी, संतोष गवारी, समाधान गवारी, अक्षय गवारी यांना अटक करण्यात आली होती.