माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी
इगतपुरीनामा न्यूज, दि. १
२० गुंठ्यांच्या आतील क्षेत्राची खरेदी विक्री करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचा अध्यादेश मागे घेऊन सामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केली आहे. राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. घर, रस्ता आणि विहिरींसाठी कमी क्षेत्र आवश्यक असते. शासनाच्या जाचक नियमांमुळे अशा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे गोरख बोडके यांनी महसुलमंत्र्यांना चर्चेप्रसंगी सांगितले.
निवेदनात नमूद आहे की, शेतकरी अत्यावश्यक कारणासाठी कमी क्षेत्राची खरेदी विक्री करत असतो. त्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांमुळे शेतकऱ्यांना अनेकदा नाहक त्रास होतो. विविध परवानग्या, नोंदणी ही प्रक्रिया पार पाडताना शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. शासनाच्या नव्या जाचक परवानग्या वाढल्याने वेळखाऊ प्रक्रिया झाली आहे. जिरायत जमीन 2 एकरापेक्षा कमी क्षेत्र असल्यास खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागते. 2 एकराच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही असा हा जाचक नियम आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. आधीच जमिनीच्या खरेदी-विक्रीत प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच आता ही परवानगी वाढल्याने जमिनीची खरेदी विक्री करणं अशक्य होईल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहे. तुकड्यात जमिनींची विक्री करण्याची गरज लहान शेतकऱ्यांना पडते. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका लहान शेतकऱ्यांना बसत आहे. शिवाय आणखी एक परवानगी लागत असल्याने लवकर काम होण्यासाठी आर्थिक गैरमार्गाचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे घर, विहीर आणि रस्त्यांसाठी जमिनीची खरेदी विक्री प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी त्रासदायक झाली आहे. म्हणून शासनाने तातडीने हा निर्णय मागे घेऊन सामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी निवेदनात केली आहे.