लेखन : विठोबा दिवटे पाटील, नांदूरवैद्य
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक|
बळीया तो पाईक त्रिलोकीचा||
लोकनेते गोपाळराव गुळवे ( दादा ) या बाप माणसाची १ नोव्हेंबरला जयंती, त्यानिमित्ताने… आपलं अख्खे आयुष्य राजकारण आणि समाजकारण यासाठी खर्ची घालून, आपला देह सुद्धा त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी ठेवला.
गेले दिगंबर ईश्वर विभूती|
राहिल्या त्या कीर्ती जगामाजी||
आयुष्यभर माणूस म्हणून जगताना, माणसाला-माणूस म्हणून वागणूक देणारे अन् त्यांच्या आकस्मिक निधनाच्या १० वर्षांनंतरही तितकीच खंत समाज मनाला वाटते… त्यावेळी त्यांचे मोठेपण सिद्ध झाल्याशिवाय रहात नाही. तीच कृतज्ञता म्हणून या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण तालुक्याने बाजार समितीच्या प्रांगणात पूर्णाकृती पुतळा उभारला असून, तालुका आजही दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या थाटात साजरी करतो अशा वेळी त्यांची कीर्ती उजळून निघते. व्यापक जनसंपर्क, प्रभावी व्यक्तिमत्व, सहजता असलेल वक्तृत्व, अन् भविष्याचा वेध घेणारी दृष्टी असणारा दादा माणूस ! कायम आपल्या माणसांत, माणसांच्या गर्दीत रमणारा, कुशल प्रशासक, अन् लोकनिष्ठ माणूस… कार्यकर्ता तयार करणारा परिस, उंची गाठण्यासाठी दृश्य-अदृश्य मार्गाने आपल्या पावलोपावली आपल्या लोकांसोबत उभं राहणारंआपलं आभाळ म्हणजे दादासाहेब गुळवे नावाचा शक्तिशाली माणूस…!
दारणेचा काठ, मुकणेचा गाळपेरा, कडवाचा पायथा, भावलीचे सौंदर्य, भामचे खोरे, वैतरणाची खासियत, अन् वाकीची खोली असा तालुक्याचा सगळा भूभाग पायाखाली आणि प्रत्येक गावचा माणूस तोंडपाठ असलेलं विरळाच… जिल्हा परिषद अध्यक्ष, साखर कारखाना चेअरमन, जिल्हा बँक संचालक, पंचायत समिती आणि बाजार समिती सभापती, जिल्हा काँग्रेस दीर्घकाळ अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष,अन् सरचिटणीस, पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष, जिल्हा औद्योगिक आणि कांदा-बटाटा संघाचे संचालक, अशी विविध पदे संघर्षातून मिळवताना, लोकनेता ही उपाधी मिळवून बसलेला हा दिग्गज माणूस… दुर्दैवाने आमदार-खासदार पदांनी थोडक्यात हुलकावणी दिलेला वजनदार नेता…
तुम्ही ऐका रे कान|
माझ्या विठोबाचे गुण||
कायम माझ्या तालुक्याला, मला शासनाकडून काय आणता येईल, याचाच विचार मनोमनी असायचा. तालुक्यात रोजगार मिळण्यासाठी गोंदे दुमाला येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी कष्ट घेतले. शिक्षणासाठी गावोगावी शाळा उभारल्या. सिंचनाच्या सुविधांसाठी विविध नद्यांवर केटीवेअर बांधून घेतले. आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्रांच्या इमारती उभारल्या. स्वतःच्या बेलगाव कुऱ्हे गावी आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी स्वतःची २० लाख रुपये किंमतीची जागा मोफत देऊन अनेक गावांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवला. कार्यकर्ते त्यांचा १ नोव्हेंबरला जन्मदिवस साजरा करत असताना, राज्यातील मंत्र्यांना आणून शेतकरी मेळाव्याचे माध्यमातून आपल्या तालुक्यातील समस्या सोडवून घेण्याचा त्यांचा उदात्त हेतू होता. शेतकरी मेळावा अथवा इतर कार्यक्रमासाठी दिग्गज नेते गोविंदराव आदिक, शिवाजीराव देशमुख, प्रभा राव, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब शिवरकर, सुशीलकुमार शिंदे, रणजित देशमुख, रोहिदास पाटील, पुष्पाताई हिरे, नारायण राणे, प्रतापराव भोसले अशा राज्यातील वजनदार नेत्यांना तालुक्यात आणून, तालुक्याचे विकासाचे राजकारण करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असायचा. प्रचंड सहनशीलता, विनम्रता व संयमाचे भांडार म्हणजे दादा…
तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या घोटी बाजार समितीत ज्या-ज्या वेळी दादा यायचे त्या-त्या वेळी रात्र असो किंवा दिवस असो लोकांचा प्रचंड गराडा असायचा. त्याच वेळी लोक दरबार सुरू व्हायचा… सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी कोणत्याही विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यास फोन व्हायचा… हॅलो मी गोपाळराव बोलतोय…. असा निर्लेप व करारी आवाज गेला, की काम झालेच म्हणून समजा. त्यांच्याकडे कामासाठी आलेला माणूस स्वतःच्या पक्षाचा की विरोधी पक्षाचा ? याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवला अथवा पाठीवर थाप मारली की, प्रचंड ऊर्जा घेऊन कार्यकर्ता आपली वाटचाल करत असे. विरोधक सुद्धा त्यांचा आदर करत असे, वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत समाज जीवनात वावरतांना तजेलदार शरीरयष्टी, आपल्या कृतीतून समाजाला दिशा दिली. त्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांमध्ये सुद्धा ते प्रिय होते.
समाजजीवनात उभी हयात घातलेल्या या आदर्श व्यक्तिमत्वाने ३ मार्च २०१० ला वर्धा येथे प्रभाताई राव यांच्या गावी कार्यक्रमासाठी जात असताना, दुर्दैवाने रात्रीच्या काळोखात गंभीर अपघातात काळाने घाला घातला. त्यांना आपला देह ठेवावा लागला, दादांनी पुस्तके कमी पण माणसे जास्त वाचली… त्यामुळे तालुका आणि जिल्हा सुद्धा रडला…
तुका म्हणे येथे भजन प्रमाण|
काय थोरपण जाळावे हे||
अशा आदरणीय दादांना…
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई|
ठेविता हा पायी जीव थोडा||
दादांना या जयंतीच्या निमित्ताने जन्मदिनी विनम्र अभिवादन…..