
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
ग्रामीण पोलीस इगतपुरी पोलीस स्टेशन येथे उज्वला प्रकाश बुकाणे वय – ४६ वर्षे, रसिका सुरेश बुकाणे वय – ४७ वर्षे, दोन्ही रा. वाडीवऱ्हे ता. इगतपुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी निंबा सयाजी शिंदे, रा. वाळविहीर ता. इगतपुरी याच्याविरूध्द भादवि कलम ४१९, ४२०,४६७, ४६८,४७१ प्रमाणे इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०८/२०१८ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ह्या घटनेत ३ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दोन्ही महिलांना फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून दिली आहे. स्टेट बँकेच्या धनादेशाद्वारे रक्कम परत मिळाल्याने महिलांनी पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि इगतपुरी पोलिसांचे आभार मानले.
उज्वला प्रकाश बुकाणे, रसिका सुरेश बुकाणे रा. वाडीवऱ्हे ता. इगतपुरी या दोन्ही महिलांची वाळविहीर शिवारातील स्वत:च्या मालकीची जमीन ही बंधाऱ्याच्या बांधकामाकरीता गेली होती. ह्या गेलेल्या जमीनीच्या भरपाई म्हणून ३ लाख ७१ हजार २५० रुपये मोबदला मिळणार होता. परंतु ह्या गुन्ह्यातील आरोपी निंबा सयाजी शिंदे याने वाळविहीर शिवारातील बंधाऱ्यात गेलेली जमीन ही स्वत:ची असल्याचे भासवुन मोबदल्याची रक्कम ३ लाख ७१ हजार २५ ० रुपये स्वत: प्राप्त करून घेतले होती. त्याने दोन्ही महिला व शासनाची दिशाभुल करून फसवणुक केलेली होती. ह्या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी ह्या गुन्ह्याचा तपास करून फसवणुक झालेली रक्कम प्राप्त केली आहे. पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण सचिन पाटील यांनी दोन्ही महिलांना त्यांच्या बंधारा बांधकामात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याची रक्कम स्टेट बँकेच्या धनादेशाव्दारे आज देण्यात आलेली आहे.