इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
मंदिरात जमा झालेल्या संपत्तीचा ट्रस्टी किंवा पुजारी वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोग करीत असल्यामुळे देशभरातील मंदिरांच्या संपत्तीचे राष्ट्रीयकरण करा, अशी मागणी ‘जिजाऊ ब्रिगेड’च्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी केली आहे. सोमवारी १८ ऑक्टोबरला कोल्हापूर येथील प्रसिद्ध अंबाबाई मंदिर येथील ‘पुजारी हटाओ’ आंदोलन छेडून यासंदर्भात जनआंदोलनाला सुरवात करणार असल्याची माहिती ‘जिजाऊ ब्रिगेड’ने दिली.
देशभरातील मंदिरांत दररोज कोट्यवधी रुपये जमा होतात. या पैशांचा पूरग्रस्त, दुष्काळी भागातील नागरिकांसाठी, देशातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी, महिलांना उद्योग उभारण्याची संधी मिळवून देण्यासाठी वापर होणे अपेक्षित असताना केवळ मंदिरांचे ट्रस्टी आणि पुजारी आपल्या आर्थिक हितासाठी या पैशांचा वापर करीत असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे देवस्थान संपत्तीचे राष्ट्रीयकरण करा, या मागणीसाठी ‘जिजाऊ ब्रिगेड’तर्फे राज्यभर जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर येथील प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात सोमवारी १८ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता अंबाबाई मंदिरात सर्व जाती-धर्मांतील ५० टक्के महिलांना पुजारी म्हणून नियुक्त करा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. मंदिरांच्या राष्ट्रीयकरणाच्या जनआंदोलनाला सुरूवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मंदिरातील पुजारी तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असून देवीचे दागिनेही लंपास करीत असल्याचा आरोप ‘जिजाऊ ब्रिगेड’ने केला आहे. त्यामुळे देवीची पुजा करण्यासाठी महिलाच खऱ्या हक्कदार पुजारी असून, पुजाऱ्यांच्या तावडीतून देवीला मुक्त करावे, या मागणीसाठी हे आंदोलन होणार असल्याचे सांगण्यात येते. यासह पालकमंत्री सतेज पाटील यांची आंदोलनकर्ते मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.