इगतपुरीनामा न्यूज दि. ०८ : महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण लक्षणीय वाढले असून दररोज बलात्काराच्या घटनांनी थैमान घातले आहे, सातत्याने यासारख्या घटना ऐकून मन सुन्न होत आहे. राज्य सरकार मात्र महिला सुरक्षिततेबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. महिला आयोगाचे अध्यक्षपद सध्या रिक्त असून सरकारला अध्यक्ष नेमणे जमत नसेल तर महिला आयोग जिजाऊ ब्रिगेडच्या हातात द्या, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राज्यपालांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून तातडीने महिला आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करावी किंवा जिजाऊ ब्रिगेड सारख्या सामाजिक संघटनांना ही जबाबदारी सोपवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाग यावी यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राज्यभर जागर निवेदन आंदोलन केले जात आहे.
दरम्यान यासंदर्भात राज्यभरात ठिकठिकाणी जिल्हाधिकार्यांना निवेदनही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष विद्या गडाख, विभागीय अध्यक्ष वैशाली डोंगरे, मुंबई अध्यक्ष अंजली भोसले, मुंबई उपाध्यक्ष गीतांजली टेमगिरे, पुणे जिल्हाध्यक्ष एकता देशमुख, संघटक सुरेखा कोल्हे विभागीय कार्याध्यक्ष संगीता पाटील, नाशिक संघटक कल्याणी वाघ, उपाध्यक्ष संगीता ढेरे आदींनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा माधुरी भदाणे म्हणाल्या की राज्यात सध्या महिला आयोगाला अध्यक्षच नाहीत. दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही केवळ अंतर्गत वादामुळे हे पद रिक्त आहे. सरकारला त्या पदावर कोणाची नियुक्ती करता येत नसेल तर एक निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करुन राज्यभरातील संघटनांचा सर्व्हे करावा आणि सक्षम संघटनेवर ही जबाबदारी सोपवावी. बलात्कारासारख्या गंभीर घटना होऊ नयेत यासाठी शक्ती कायदा अस्तित्वात आला, पण तो अजूनही नियम पोटनियम या गोंधळात अडकून पडला आहे. त्यामुळे गुन्हेगारांना धाक उरलेला नाही. बलात्कारासारख्या घटनांवर अंकुश ठेवायचा असेल तर शक्ती कायद्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तातडीने या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी माधुरी भदाणे, विद्या गडाख, वैशाली डुंबरे यांनी यावेळी राज्यपालांकडे केली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड तर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शाल, जिजाऊ प्रतिमा आणि अधिवेशन विशेषांक देत सन्मान करण्यात आला. तसेच 12 जानेवारी रोजी जिजाऊंची जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात पन्नास टक्के महिला पुजारी नियुक्त करावेत : अंबाबाई मंदिरात प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. भक्त देवीला रोख रक्कम किंवा दागिने अर्पण करतात, ते पुजाऱ्यांच्या ताब्यात नसावेत. सर्व रक्कम आणि दागिने सरकारी खजिन्यात जमा करावेत. सर्व जाती धर्मातील महिलांना अंबाबाई मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त करण्याची तरतूद आहे त्यामुळे जुने पुजारी हटवून त्या जागी नवीन प्रशिक्षित पुजाऱ्यांकडे कडे पूजा-अर्चा सोपवावी अशीही मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करत हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी आणि सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा माधुरी भदाणे यांनी यावेळी दिला आहे.