अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लक्ष्मीनगर येथे मोफत संगणकीकृत सातबारा वाटप
इगतपुरीनामा न्यूज, दि. २
आता नागरिकांना मोफत संगणकीय सातबारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना सातबारा समजण्यासाठी अत्यंत सोपा सुलभ झाला आहे. नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाचा महसूल विभाग सातत्याने प्रयत्नशील असून संगणकीकृत सातबारा व ई-पीक पाहणी उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान आहे असे प्रतिपादन नांदगाव बुद्रुकचे मंडळ अधिकारी सुयोग वाघमारे यांनी केले. सातबारा उताऱ्यात क्षेत्र दुरुस्ती अथवा अन्य काही चुका आढळल्या तर संबंधित तलाठी कार्यालयात संपर्क साधून अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इगतपुरी तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी म्हणाले की, नागरिकांना सहज व तत्परतेने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील महसूल अधिकारी कटिबद्ध आहेत. महसूल विभागाने सातबारासोबत ई- पिकपहाणी संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत असे सोमनाथ जोशी शेवटी म्हणाले.
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कार्यक्रमात सभापती सोमनाथ जोशी, मंडळ अधिकारी सुयोग वाघमारे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सर्वांगीण माहिती देण्यात आली. उताऱ्यावरील पोटखराबे वहिवाटीला लावून घेणे, इतर अधिकाराबाबत दुरुस्तीची माहिती देवून अभिप्राय फॉर्म भरून घेण्यात आले. संजय गांधी निराधार योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी ९८ शेतकऱ्यांना मोफत संगणकीय सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. सरपंच ज्ञानेश्वर करवर, पोलीस पाटील कान्हू करवर, तलाठी मनोज मोरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गतीर, विजय दराणे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव खोकले, माजी उपसरपंच दत्तात्रय डोखे, सुदाम बेडकोळी आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
संगणकीकृत सातबारा वितरण करतांना अंध शेतकरी तुकाराम गोपाळ चिरके ह्या शेतकऱ्याला प्राधान्याने सातबारा वाटप करण्यात आला. डोळे असूनही सातबाऱ्याची माहिती डोळसपणे घेतली नाही तर नुकसान होऊ शकते. मात्र अंध असूनही जागरूकतेने हजर राहून सातबारा उताऱ्याची इत्यंभूत माहिती संबंधित शेतकऱ्याने अधिकाऱ्यांकडून घेतली.