इगतपुरी तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा :शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

पारंपरिक शेतीची जागा आधुनिक आणि यांत्रिकीकरणाच्या शेतीने घेतली असली तरी अद्यापही ग्रामीण भागातील शेतीची भिस्त बैलाच्या औतावरच अवलंबून आहे. या औताकरिता आवश्यक असणाऱ्या बैल पोळ्याचा सण आज इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा करून बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषता पूर्व भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. खरीप हंगामातील भातासह इतर मुख्य पिकाच्या लागवडीनंतर मशागतीच्या कामात बैलाना विश्रांती मिळते. याच कलावधीत येणाऱ्या पोळा या सणाकडे संपूर्ण शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. या सणाच्या पूर्वसंध्येला बळीराजा आपल्या बैलाना गरम पाण्याने आंघोळ घालून, त्याचा दुधाने अभिषेक करून त्याची लोणीने खांदामळणी करतो. दुसऱ्या म्हणजे पोळ्याच्या दिवशी पुन्हा त्याची आंघोळ घालून, त्याची सजावट करून, मिरवणूक काढीत असतो. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य देवून बळीराजा बैलाबाबत आपली कृतज्ञता व्यक्त करीत असतो.

आज जरी पारंपरिक शेतीची जागा आता यांत्रिकीकरणाच्या शेतीने घेतली असली तरी बैलाची जागा कुणीच घेऊ शकत नाही. असे असताना मात्र तालुक्यातील पूर्व भागात पशुपालकाची संख्या जैसे थेच असून या भागात आजही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात येतो. या भागात मिरवणूक काढून यादिवशी अव्वल ठरणाऱ्या पशुपालकाला गौरवण्यात येते. आजही बैलपोळ्याच्या दिनी हा उत्साह तालुकाभरात जाणवून आला. दरम्यान यंदाच्या हंगामात तालुक्यात सर्वत्र  समाधानकारक पाऊस वेळेवर झालेली शेतीची कामे आणि आबादानी लक्षात घेता खेडयापाडयासह ग्रामीण भाग व शहरी भागातही उत्साह संचारल्याचे दिसुन आले.

गेल्या वर्षापेक्षा यंदा शेतीबाबत समाधानकारक वातावरण आहे शिवाय सगळीकडे आबादानी सारखीच वाटत असल्याने पोळयाचा सण उत्साहात साजरा करता आला निसर्गाने अशीच कृपा कायम ठेवावी यामुळे मनाला खुपच आनंद वाटतो.
- शंकर जाधव, शेतकरी तळेगाव

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!