शिक्षणाची अखंड ज्ञानधारा अतिदुर्गम भागात रुजवणारे आदर्श शिक्षक प्रमोद पांडुरंग परदेशी

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा

वाघाच्या तोंडात हात घालावा इतक्या सहजतेने परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून शिक्षणाची अखंड ज्ञानधारा अतिदुर्गम भागात रुजवणारे आदर्श शिक्षक प्रमोद पांडुरंग परदेशी. अवघ्या महाराष्ट्रात दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थी आणि आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी त्यांचा “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” मैलाचा दगड ठरला आहे. दुर्गम दऱ्याकपारीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात सावित्री जोतीच्या अखंड शिक्षणाचा दिवा उजळवणाऱ्या ज्ञानदुत प्रमोद परदेशी यांच्या कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे. ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्यासारख्या शिक्षकांसमोर नतमस्तक व्हावे इतकं त्यांचं कार्य मोठं आहे.

धुळे नंदुरबार सारख्या कायम कुपोषित आणि दुर्लक्षित आदिवासी भागात ज्ञानदानाचे कार्य निष्ठेने करणारे पांडुरंग राजाराम परदेशी हे त्यांचे वडील. आई सुमन यांची शिक्षणाविषयी आत्मीयता आभाळाएव्हढी विशाल होती. प्रसंगी पती पांडुरंग परदेशी ह्यांनी मिळणाऱ्या वेतनाचा मोठा हिस्सा गरीब विद्यार्थ्यांना लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यावर करावा यासाठी त्या आग्रही असत. अशा विजिगिशु परिवारात प्रमोद परदेशी यांनी लहानपणापासून शिक्षणविषयक आस्था अंगी बाणवली. 

भरघोस पगार देणाऱ्या अन्य क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या प्रमोद परदेशी यांनी आईवडिलांच्या शैक्षणिक स्वप्नांसाठी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा निर्णय घेऊन स्वप्नपूर्तीसाठी महत्वाचे पाऊल उचलले. २००२ मध्ये इगतपुरी तालुक्यातील कऱ्होळे येथे शिक्षक म्हणून प्रमोद परदेशी यांच्या शिक्षकी व्रताला प्रारंभ झाला. शाळेत हजर होतांना वडीलांनी त्या दिवशी सोबत राहून आयुष्यभर सुजाण आणि सदृढ पिढीसाठी तन मन धनाने प्रामाणिक कार्य करण्याचा शब्द घेतला. त्यानुसार आज मागे वळून पाहतांना प्रमोद परदेशी यांचे इथले विद्यार्थी, डीएड, इंजिनिअर, पदवीधर होऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना आढळतात. हे शिक्षकी व्रताचे पहिले यशस्वी फलित म्हणावे लागेल. 

२००६ मध्ये भुतांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगतवाडी शाळेत बदली झाली. ह्या गावात कोणीही ८ वी च्या पुढे शिकत नव्हते. प्रमोद परदेशी यांनी भुतांच्या शाळेची ओळख कायमची पुसून काढली. गावात प्रभावी समाज प्रबोधन, विविध उपक्रम आणि प्रचंड लोकसहभाग उभा केला. इथली अभिमानास्पद कामगिरी म्हणजे आयएसओ मानांकनासोबत इथले विद्यार्थी विज्ञान शाखेची पदवी घेण्याकडे वाटचाल करीत आहेत. ७ वी नंतर चूल आणि मूल मध्ये कोंडमारा होणाऱ्या विद्यार्थिनी १२ वी मध्ये यशाचा सुगंध पसरवत आहेत. २०१८ मध्ये अतिदुर्गम धामडकीवाडी शाळेत बदली होऊन ह्या आदिवासी वाडीत प्रमोद परदेशी यांना आव्हानात्मक कामगिरी करण्याची संधी मिळाली. 

आजा मेला पणजा मेला बाप मसना नेला…पण धामडकीवाडीला रस्ता नाही झाला..! अशा आदिवासी वाडीत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनाही शिक्षणाचे अमृतकण खऱ्या अर्थाने देणारे प्रमोद परदेशी देवदूत ठरले. राज्यात आणि राज्याबाहेर प्रचंड प्रसिद्धीला आलेला टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न त्यांनीच नावारूपाला आणला. मोबाईलचे नेटवर्क म्हणजे काय ? असा यक्षप्रश्न पडणाऱ्या धामडकीवाडीत कोरोना काळात विद्यार्थ्यांना शाळेत गेल्याची अनुभुती देणारा अलौकिक चमत्कार प्रमोद परदेशी यांनी घडवला. आगामी काळात संपूर्ण राज्यभर त्यांचा धामडकीवाडी पॅटर्न अतिदुर्गम शाळांमध्ये राबवला जाणार गेल्याचे संपूर्ण श्रेय प्रमोद परदेशी यांना द्यावे लागेल.

त्यांच्याकडून पेहेचान प्रगती फाऊंडेशनच्या प्रगती अजमेरा यांच्या माध्यमातून दत्तक शाळा, मोफत शैक्षणिक साहित्य आदी उपक्रम नियमित राबवले जातात. स्वतःची शाळा आणि अन्य शाळेतही विद्यार्थ्यांना दरवर्षी मुबलक वह्या वाटप, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे पिंप्रीसदो, बोर्ली, धामडकीवाडी येथील लोकांच्या हागणदारी मुक्तीसाठी मोफत शौचालय बांधकाम, लायन्स क्लब जुहू तर्फे आंबेवाडी शाळेसाठी सुसज्ज नवीन इमारत प्रमोद परदेशी यांच्या प्रयत्नांनी उभी राहिली. कोरोना काळात शेकडो आदिवासी कुटुंबाना पेहेचान प्रगती फाऊंडेशन, वेबग्योर इंटरनॅशनल स्कूल अंधेरी, स्नेहलता अँड परमेश्वर लखोटिया फाऊंडेशन कडून किराणा वाटप सुद्धा त्यांच्यामुळेच करण्यात आला. आतापर्यंत सर्व कामे मिळून ९० लाखांचे सामाजिक काम प्रमोद परदेशी यांनी उभे करून दाखवले. हे सगळं राज्य शासनाला भावलं म्हणूनच त्यांना राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

प्रत्येक शाळेत आणि गावात प्रश्न असतात, ते जाणवत असतात, दिसत असतात; पण कोणताही शिक्षक ते प्रश्न पाहण्याचं, त्यांना भिडण्याचं धाडस करीत नाही. प्रमोद परदेशी वेगळे आहेत ते या बाबतीत. एखादा शिक्षक किती विविधांगी कार्य करू शकतो हे प्रमोद परदेशी यांनी सर्वांना दीपस्तंभ बनून दाखवून दिलेलं आहे. धडपड्या, संवेदनशील आणि सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या प्रमोद परदेशी यांनी अतिदारिद्र्याच्या छायेतल्या धामडकीवाडीमध्ये पथदर्शक काम उभं केलेलं आहे.

अशाश्वत जीवनाची लढाई लढणाऱ्या आदिवासी बांधवांना पोटापाण्याचीच एवढी भ्रांत पडलेली असते की, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा विषय त्यांना कसा सुचावा ? आईबापांना पोटासाठी मदत करतांना शिक्षण नकोच असा विचार बळावलेल्या धामडकीवाडीत मनामनात शिक्षणधारा पोहोचवणाऱ्या संवेदनशील मनाच्या प्रमोद परदेशी ह्या अलौकिक शिक्षकाला शिक्षक दिनानिमित्त शतदा वंदन….!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!