इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
युवक युवतींच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहित करावयास हवे. नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावयाचा याची माहिती त्यांना उपलब्ध करून दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल असे प्रतिपादन इगतपुरीचे निवडणूक नायब तहसिलदार एम. एस. कारंडे यांनी केले.
येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व तहसीलदार कार्यालय इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नव मतदार नोंदणी ऑनलाईन वेबिनार कार्यक्रम प्रसंगी श्री. कारंडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. श्री. कारंडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की योग्य पध्दतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी नव मतदार नोंदणी अभियानात सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. यासह आपल्या परिसरात जनजागृती करण्याचे आवाहन केले.
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीचे तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. बी. सी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर, प्रा. के. के. चौरसिया, प्रा. एस. के. शेळके, प्रा. डॉ. के. एम. वाजे, प्रा. ए. बी. धोंगडे, प्रा. ए. एस. वाघ, प्रा. व्ही. डी. दामले, प्रा. बी. एम. जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. बी. एस. महाले यांनी केले. आभार प्रा. एस. बी. फाकटकर यांनी मानले.