वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
मुंबई आग्रा महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लहान मोठ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघातही होत आहेत. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यासाठी आज नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली टोल प्रशासनाला रस्ता दुरुस्तीसाठी चार दिवसांचा अल्टीमेटम निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अन्यथा “खळ् खट्याक्”ला सज्ज राहावे असे टोल प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
जिल्ह्याचे व मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी तालुक्यात घोटी टोल नाक्यावर टोल वसुली जोमात सुरू आहे. रस्ते मात्र कोमात गेले आहेत. तरीही टोल व्यवस्थापन रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. ह्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होऊन टोल प्रशासनाला वेठीस धरत चार दिवसांत महामार्ग दुरुस्त नाही केला तर टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी टोलनाका व्यवस्थापनाच्या वतीने मनसेचे निवेदन घेऊन लवकरच रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्यासह तालुकाध्यक्ष मूळचंद भगत, तालुका उपाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, माजी सरपंच कैलास भगत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, प्रताप जाखेरे, गणेश उगले, निलेश जोशी, पूनम राखेचा, संतोष बिन्नर आदी पदाधिकारी उपस्थित होते.