इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ : ग्रंथालयातून चांगली पुस्तके वाचकांपर्यंत जाणे महत्त्वाचे असून वाचन संस्कृती जोपासण्याचे कार्य ग्रंथालये मोठ्या प्रमाणात करत असतात. सुजाण वाचक घडविण्यामध्ये ग्रंथालयाचे कार्य मोलाचे असते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शाहीर उत्तम गायकर यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्ताने ग्रंथालय दिनाच्या कार्यक्रमात श्री. गायकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड हे होते. श्री. गायकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आज मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला असून ग्रंथालयांनी वाचक घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रगतीचा व उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यात करावयाच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डी. एच. शेंडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. डी. दामले यांनी केले. आभार प्रा. एस. के. शेळके यांनी मानले.