इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
कोरोनाचे संक्रमण थंडावले असले तरी अजून धोका मात्र टळलेला नाही. भविष्यात कोरोनाचे निर्दाळन करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. लोकांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. आमची आरोग्य यंत्रणा यासाठी सज्ज असून नागरिकांनी आपले लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे असे आवाहन वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांनी केले आहे. यासह शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे सुद्धा कटाक्षाने पालन करावे असेही ते म्हणाले.
मुंढेगाव ता. इगतपुरी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी नागरिकांना प्रबोधन करतेवेळी बोलत होते. त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना आरोग्यविषयक प्रबोधन केले. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा यशस्वीपणे कोरोना सोबत लढा देत आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी लसीकरण करणे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे ते शेवटी म्हणाले.
मुंढेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण सत्र अतिशय शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाने नियोजनबद्ध लसीकरण पार पाडल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांनी विशेष कौतुक केले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रकाश चौधरी, वैशाली ढोणे, भाग्यश्री घरटे, स्मिता मोरे, सुनीता अस्वले, मनीषा क्षीरसागर, शोभा मोरे, राधा शेलार, रज्जाक शेख, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी आदींनी साहाय्य केले.