इगतपुरी तालुका म्हणजे लोककला आणि शेकडो कलावंतांची फौज घडवणारे विद्यापीठ

लेखन : भगीरथ शिवनाथ मराडे

इगतपुरी तालुक्याला मोठा पौराणिक इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शहाजीराजे, जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर वामनदादा कर्डक, शुरवीर राघोजी भांगरे आदी दिग्गज शुरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला इगतपुरी तालुका आहे. सह्याद्रीच्या चित्ताकर्षक डोंगरदऱ्या आणि विविध अंगांनी नटलेल्या इगतपुरी तालुक्याला लोककला आणि कलावंतांची उज्वल परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ, मधला काळ आणि सध्याचा काळ ह्यामध्ये लोककला अधिकाधिक समृद्ध झाल्याचे आनंददायी चित्र आहे. जग कितीही डिजिटल होऊ द्या, कितीही मनोरंजनाची साधने येऊ द्या. लोककला प्रत्येक रसिकांच्या नसानसात भिनलेली असल्यामुळे पुढील ५० वर्ष तरी लोककला चांगलीच बहरेल असे दिसते. हे सगळे श्रेय रसिक मायबापांना दिल्याशिवाय कृतज्ञता व्यक्त केली असे म्हणता येणार नाही.  

स्वातंत्र्य पूर्व काळात लोककलेच्या विविधांगी जागृतीमुळे लोकांमध्ये नवचैतन्य आणि राष्ट्रभावना जनजागृतीचे काम इगतपुरी तालुक्यात झालेले आहे. यामुळे समाजाच्या नसांमध्ये संदेश पोहोचवून स्वातंत्र्य मिळवायला बरीच मदत होऊ शकली. दुर्दैवाने अनेक कलावंत पडद्यामागच्या कलाकारांची भूमिका बजावत असल्याने त्याची कुठे नोंद होऊ शकली नाही. तथापि जुन्या जाणत्या लोकांकडून ह्याची आजही पुष्टी मिळते.   त्या काळात खडतर उपासमार सोसून कलेला समर्पित झालेले अनेक कलावंत ह्या तालुक्याने राज्याला दिले. ह्यामध्ये दिवंगत शाहीर शिवनाथ मराडे, एकनाथ गोऱ्हे, यशवंत रुपवते, सांजेगाव आहुर्लीचे शाहीर, गायक, वादक, साथसंगत करणारे कलाकार ह्यांचा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. इगतपुरी तालुक्यात अनेकांनी आपापल्या परीने जसा जमेल तसा सहभाग घेऊन कलेला आपले जीवन मानले. त्यांच्यामुळेच आजही इगतपुरी तालुक्यातील लोककला राज्यातच नाही तर देशाच्या विविध भागात जाऊन पोहोचलेली आहे. ह्याचा अभिमान वाटत तर आहेच पण दूरदर्शी मार्गदर्शक व्यक्तिमत्वाची चिरंतन स्मृती कलाकारीच्या माध्यमातून जिवंत आहे.

इगतपुरी तालुक्यातील कलावंत क्षेत्रातल्या अनेकांनी स्वातंत्र्यपुर्व काळात केलेल्या जनजागृतीचा फायदा देशाला झाला. इगतपुरीत स्वातंत्र्य सैनिक स्व. पासलकर व इतर सहकारी यांच्यासोबत अनेक कलाकारांनी सहभाग घेतला. मात्र दुर्दैवाने हे कलावंत कोण होते त्यांच्या बद्दल लिखाण किंवा पुरावा उपलब्ध नाही. ज्या वेळेला स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घ्यायचे त्यावेळी मनोरंजनाचे साधन जनजागर करण्याचे साधन झाले. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावोगावी विविध प्रकारचे कलावंत निर्माण झाले.

आठ दिवस चालणारा बोहडा, गोंधळी, वाघेमुरळी, नाट्य कलावंत आदींमुळे आजही लोककला फुलत आहे. गावोगावी होणारे यात्रोत्सव यात टाकेद, काळुस्ते, कावनई, घोटी आदी गावातील यात्रांमध्ये कलावंतांनी आपल्या कलेची मजबूत पकड घट्ट केलेली आहे. यामुळे सर्वधर्मीय, सर्वजातीय सामाजिक एकता निर्माण झाल्याचे अभिमानाने म्हणावे लागेल.

सांस्कृतिक, वारकरी सांप्रदायिक, क्रीडा, बोहडा, कांबड नाच, दांडपट्टा यामुळे समाजभान जागे झाले. ह्या परंपरेतून दिग्गज कलाकारांच्या सानिध्याने आणि मार्गदर्शनाने कलावंतांची मोठी फौज इगतपुरी तालुक्यात उभी राहिली. यातुन कलाकारांचा होणारा जीवन प्रवास फक्त आणि फक्त लोककला जिवंत राहण्यासाठी खर्च झाला. प्रत्येकाकडे असणारी वेगळ्या वेगळ्या धाटणीच्या कला शिकण्यासाठी गुणवंत कलाकार इगतपुरीला येऊ लागले. यामुळेच कलारत्न गुणवंत कलाकार राज्यभरात आमच्या इगतपुरी तालुक्याचे नाव आदराने गुरुस्थानी असल्याचे अधोरेखित करीत असतात.

दीर्घकाळ चालणार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सामना रात्रभरासाठीचे आकर्षक कार्यक्रम, गावोगावच्या पारावरील शाहिरी जलसे, तमाशे, नाटक, रामलीला इत्यादी कला सामान्य माणसाला मनोरंजनातून समृद्ध करतात. दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीची मनोरंजन करणारी लोककला लोकांच्या मनात ठाण मांडून घट्ट रुजली आहे. त्यामुळेच आता गावोगावी छोटेमोठे नवनवीन कलावंत तयार व्हायला लागले. रसिकांची मने जिंकलेले कलाकार नव्या लोकांना घडवत असल्याने सर्वांना नवीन उर्जा मिळू लागली आहे. या अभ्यासासाठी कलाकारात शिकण्यासाठी एकमरकांची कला आणि कलाकार एकत्र होण्याची प्रक्रिया रुजू लागली. ह्या गुरू शिष्य परंपरेमुळे लोकांना दर्जेदार लोककला अनुभवायला मिळू लागली.

वारकरी सांप्रदायाच्या परंपरेचा वारसा इगतपुरी तालुक्याला लाभलेला आहे. इगतपुरीतील जोग महाराज भजनी मठात संतांच्या ज्ञानामृताचा वारसा माधव महाराज घुले यांच्यामुळे सर्वांना पाहायला मिळतो. ह्यामुळेच राज्यात सर्वोत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, भारुड कलावंत, गायक, वादक, लेखक, अभ्यासक उभे राहू शकले. ही सुद्धा कला जिवंत ठरवण्याची प्रक्रिया आहे. कारण त्यामुळेच पुढील काळात विविधांगी कलाकार समाजात तयार झाले. धनंजय महाराज गतीर, विजय महाराज चव्हाण आदींच्या लक्षणीय ध्येय धोरणात्मक कार्यामुळे कला क्षेत्राला ऐतिहासिक खजिना लाभला आहे. राज्यात विखुरलेल्या भागात जिवंत असलेली कला ह्या सर्वांमुळे लोकमनात आपले अढळ स्थान टिकवून आहे.

शब्दांची बुलंद तोफ शाहीर अमर शेख, लेखणी सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सहवासात  असणारे स्वातंत्र्य सेनानी लोकशाहीर शिवनाथ मराडे यांचा वारसा शाहीर बाळासाहेब भगत यांनी समर्थपणे लोकार्पित केलेला आहे. बाळासाहेबांनी आई सप्तशृंगी मातेची गाणी आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवर रेंगाळत असतात. “विनायक प्रस्तुत ” वारसा महाराष्ट्र लोककलेचा अर्थात शाहिरीचा या नावाने प्रसिद्ध असलेली कलावंत संस्था ते चालवतात. गेल्या २५ वर्षा पासुन आता पर्यंत रोजच बाळासाहेब भगत यांच्याकडून अखंड आणि अविरत लोककला जपण्याचे लोकाभिमुख कार्य पार पडत आहे. त्यांच्या लोककलेच्या माध्यमातुन खुप कलावंत आज तयार झाले आहेत.

त्यांची सांस्कृतिक लोककलेला शास्त्रीय संगीताची जोड मिळाली. म्हणूनच इगतपुरी तालुक्यात शास्त्रीय गायक, वादक, आज समर्थपणे लोकसेवेत दाखल आहेत. नवोदित कलावंतांना योग्य व्यासपीठाची गरज असल्याचे पाहून बाळासाहेब भगत हे कलावंतांचे विद्यापीठ झाल्याचे कलाक्षेत्रात म्हटले जाते. यामुळेच २०२५ येऊद्या अथवा २०५० येऊद्या.. जोपर्यंत रसिक मायबापांच्या मनामनात कला जिवंत आहे तोपर्यंत लोककला, लोककलावंत, वाद्ये, परंपरा अखंडित राहिल ह्यात अजिबात शंका नाही. हे सगळे यश रसिक मायबापाच्या चरणी समर्पित करणारे लोक कलावंत इगतपुरी तालुक्याचा अभिमानास्पद इतिहास आहे असे मी समजतो.

विनायक प्रस्तुत " 
वारसा महाराष्ट्र लोककलेचा
---------------------------
गायक : शाहीर बाळासाहेब भगत
सहगायक : विनायक भगत, आरती भगत, मेघा गणाचार्य, देवीदास कडू, मच्छिंद्र गणाचार्य
वादक : शरद जाधव ( बँजो ), प्रभाकर राक्षे ( बँजो आर्गन ), विलास डावखर ( आर्गन )
ढोलकी/ढोलक : रामा भोर
तबला : नकुल भगत, कैलास म्हसणे
संभळ वादक : रोशन भिसे

( लेखक सुप्रसिद्ध शाहीर स्व. शिवनाथ मराडे यांचे चिरंजीव आहेत. महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या कळसुबाई मित्रमंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष असून नामवंत गिर्यारोहक आहेत. यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते जिल्हा संघटक म्हणून काम सांभाळतात. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!