इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यातील इगतपुरी आणि अकोला या आदिवासी तालुक्यांना जोडणाऱ्या पिंपळगाव मोर ते भंडारदरा या रस्त्याची दुरस्ती आणि मजबुतीकरण व्हावे, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाने ९८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ आज शासनाने पिंपळगाव मोर ते भंडारदरा या दरम्यानच्या साडे तेरा किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. पिंपळगाव मोर ते भंडारदरा रोड या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने इगतपुरी आणि अकोला या आदिवासी बहुल तालुक्यांमधील आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने पिंपळगाव मोर ते भंडारदरा या रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
घोटी – भंडारदरा या राज्यमार्गालगत एसएमबीटी रुग्णालय असून भंडारदरा, रतनगड, कळसुबाई शिखर ही पर्यटन स्थळे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे दोन आदिवासी तालुके या रस्त्यामुळे एकमेकांना जोडले गेलेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून घोटी – भंडारदरा या राज्यमार्ग क्र. २३ ची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली असून अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झालेली आहे. वाहनधारकांना जीव मुठीत धरुन वाहने हाकावी लागत असून महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांसह प्रवासी, वाहनधारक, पर्यटक तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे सततच्या तक्रारी सुरु होत्या. या रस्त्याच्या दुरावस्थेची गंभीर दखल घेत खासदार गोडसे यांनी राज्य शासनाकडे सततचा पाठपुरावा करुन सहा महिन्यांपूर्वी ९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतलेला आहे.
निधीच्या मान्यतेनंतर पिंपळगाव मोर ते भंडारदरा रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठीच्या खा. गोडसे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राज्य शासनाने आज या रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या ९८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे पिंपळगाव मोर ते भंडारदरा रोड दरम्यानच्या रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणामुळे आदिवासी बहुल इगतपुरी, अकोला या दोन तालुक्यांचा विकास होणार असून यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. पिंपळगाव मोर ते भंडारदरा रोड या दरम्यानच्या रस्त्याच्या मजबुतीकरणात चार नवीन मोऱ्यांचे बांधकाम असणार असून दोन लहान पुलांचा समावेश आहे. या रस्त्याची रुंदी २१ फूट इतकी असणार असून या रस्त्या दरम्यान २८ पाईप मोऱ्यांची पुनर्बांधणी तसेच अनेक ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात येणार आहेत. या रस्त्याच्या बळकटीकरणामुळे घोटी परिसरातील एस.एम.बी.टी. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची होणारी कुचंबना टळणार असून पिंपळगाव मोर ते भंडारदरा या दरम्यानच्या रस्त्याचे काम राज्य शासनाच्या महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली.